सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना भारतीय फलंदाज श्रेयर अय्यरला डाव्या बरगडीला दुखापत झाली. त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर त्याला ताबडतोब सिडनीतील एका रुग्णालयात हलवण्यात आले. श्रेयर अय्यरवर रुग्णालयात उपचार सुरू असताना भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्या दुखापतीबद्दल महत्त्वाची माहिती दिली.
पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने सांगितले की, "श्रेयसची प्रकृती आता सुधारत आहे. जेव्हा मला त्याच्या दुखापतीबद्दल कळले, तेव्हा मी लगेच फिजिओ कमलेश जैन यांच्याशी बोललो. आता अय्यर फोनवर बोलत आहे, तो लोकांशीही बोलत आहे, डॉक्टर त्याच्यासोबत आहेत. पुढील काही दिवस त्याच्यावर लक्ष ठेवले जाईल. देवाच्या कृपेने आता सर्व काही ठीक आहे. मालिका संपल्यानंतर आम्ही त्याला भारतात परत आणू. "
दरम्यान, बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, श्रेयसची प्रकृती लक्षणीयरीत्या सुधारली आहे. तो आता स्थिर असून त्याला आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले आहे आणि पुढील काही दिवसांत त्याला डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे तो लवकरच मायदेशी परतण्याची शक्यता आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना २९ ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे खेळला जाईल. श्रेयस अय्यर या आगामी टी२० मालिकेचा भाग नाही.