भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने वैयक्तिक कारणास्तव देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात गोवा संघाकडून खेळण्याची इच्छा आहे, यासंदर्भात त्याने मुंबई क्रिकेट असोसिशनला पत्र लिहिले होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनने देखील त्याची ही विनंती मान्य केली आहे. दरम्यान त्याच्यासह सूर्यकुमार यादवही अन्य काही खेळाडूंसह मुंबई संघ सोडून दुसरीकडे जाण्याच्या तयारीत आहे, अशी चर्चा रंगली. यासंदर्भातील बातमी वाचून सूर्यकुमार यादवची तळपायाची आग मस्तकाला गेली. भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारानं सोशल मीडियावर संबंधित बातमीची पोस्ट शेअर करत खोट्या अफवा पसरवणाऱ्यांची शाळा घेतली. हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबई संघ सोडणार असल्याच्या बातमीचा सूर्यानं घेतला समाचार
सूर्यकुमार यादवनं मुंबई संघ सोडण्याच्या वृत्ताचा स्क्रिन शॉट शेअर करत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांचा समाचार घेतला. सूर्यानं पोस्ट शेअर करताना लिहिले होते की, ''स्क्रिप्ट रायटर आहात की जर्नलिस्ट? हसायचे असेल तर आता कॉमेडी चित्रपट बघायचे सोडून या प्रकारचे लेख वाचतो. हे एकदम बकवास आहे, अशा शब्दांत बातमीतील हवा त्याने काढली होती.
सूर्या भाऊची बायको देविशासह महागडी शॉपिंग; IPL मध्ये मिळणाऱ्या पगारापेक्षा अधिक खर्च
आता मुंबई क्रिकेट असोसिएशनचाही आला रिप्लाय
मुंबई क्रिकेट संघानेही गुरुवारी सूर्यकुमार यादवसंदर्भातील वृत्त फेटाळून लावले आहे. सूर्यकुमार यादव आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेत आपल्या काही सहकाऱ्यांसोबत गोवा संघाकडून खेळण्याच्या तयारी असल्याची योजना आखत असलेले वृत्त खोटे आहे. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार क्रिकेटच्या सर्व प्रकारात मुंबई संघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी कटिबद्ध आहे.
गोवा संघाकडून कॅप्टन्सीही करताना दिसू शकतो यशस्वी
मुंबईच्या ताफ्यातील काही वरिष्ठ खेळाडूंसोबत असणाऱ्या मतभेदांमुळे यशस्वी जैस्वाल याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतल्याचेही बोलले जाते. जैस्वालनं २३ ते २५ जानेवारी दरम्यान रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू काश्मीर विरुद्ध मुंबईकडून अखेरचा सामना खेळला होता. गोवा क्रिकेट संघाकडून खेळताना तो कॅप्टन्सी करतानाही दिसू शकतो.