भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याने ऐतिहासिक भरारी घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) काही दिवसांपूर्वी २०२३च्या सर्वोत्तम ११ खेळाडूंचा ट्वेंटी-२० संघ जाहीर केला होता आणि त्याचे नेतृत्व सूर्यकुमारकडे सोपवण्यात आले होते. आज त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आयसीसीच्या २०२३च्या ट्वेंटी-२०मधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार सूर्यकुमार यादवने पटकावला. २०२२ व २०२३ अशी सलग दोन वर्ष हा पुरस्कार त्याने जिंकला आणि दोनवेळा हा पुरस्कार जिंकणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. सूर्यासोबत या शर्यतीत सिकंदर रझा, अल्पेश रामजानी आणि मार्क चॅम्पमन हेही होते.
सूर्यकुमार यादवने २०२३ मध्ये १७ डावात ४८.८६च्या सरासरीने व १५५.९५च्या स्ट्राईक रेटने ७३३ धावा केल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच सामन्यात सूर्याला श्रीलंकेविरुद्ध केवळ ७ धावा करता आल्या होत्या, परंतु पुढील दोन सामन्यांत त्याने ५१ ( ३६ चेंडू) व ११२*( ५१ चेंडू) धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने हेच सातत्य कायम राखताना ४४ चेंडूंत ८३ धावा केल्या होत्या. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात ४५ चेंडूंत ६१ धावांची खेळी केली. 
ऑस्टेलियाविरुद्धही त्याने ४२ चेंडूंत ८० धावा कुटल्या होत्या आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकही झळकावले होते.  जानेवारीत त्याने श्रीलंकेविरुद्ध ५१ चेंडूंत ९ चौकार व ७ षटकार खेचून ११२ धावांची खेळी केली आणि ती संस्मरणीय ठरली. त्याने ४५ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त रोहित शर्मानंतर ( ३५ ) जलद शतक झळकावण्याचा मान त्याने पटकावला.   
