Join us
Daily Top 2Weekly Top 5

Suryakumar Yadav: टीम इंडियाचा स्टार फलंदाज आहे सूर्यकुमार, तरीही म्हणतो 'या' संघात खेळण्याचं स्वप्न

सध्या रणजी ट्रॉफीचा थरार रंगला असून सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघाचा हिस्सा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 16:42 IST

Open in App

मुंबई : सध्या रणजी ट्रॉफीचा थरार रंगला असून भारतीय संघातील काही युवा खेळाडू देखील या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यामध्ये संघाचा आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादवचा देखील समावेश आहे. ट्वेंटी-20 आणि वन डे क्रिकेटमधील शानदार कामगिरीनंतर सूर्यकुमार यादव प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. भारतीय चाहते त्याची तुलना मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सशी देखील करतात. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक खेळीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या सूर्याने आपला मोर्चा कसोटीकडे वळवण्याचा निर्धार केला आहे. सूर्याने जवळपास 3 वर्षांपूर्वी रणजी ट्रॉफीत कसोटी सामना खेळला होता. 

सूर्याने व्यक्त केली इच्छासूर्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईच्या संघाचा हिस्सा आहे. अशातच सूर्याने भारतीय संघासाठी कसोटी खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "होय, नक्कीच मी नेहमीच भारतासाठी कसोटी खेळण्याचे स्वप्न पाहिले आहे. मी राज्यस्तरीय पातळीवर रेड बॉल क्रिकेट खेळत आलो आहे, हळूहळू व्हाईट बॉल क्रिकेट खेळायला लागलो. मला वाटते की ते (कसोटी) फॉरमॅट सर्वोत्तम आहे तिथे खेळताना खरोखर आनंद वाटतो", असे सूर्याने हैदराबादविरूद्ध होणाऱ्या सामन्याच्या आधी सांगितले. उद्या मुंबई विरूद्ध हैदराबाद असा सामना होणार आहे.

"रेड बॉल क्रिकेट खूप जवळचे आहे कारण जेव्हापासून रणजी ट्रॉफीत मी क्रिकेट खेळायला लागलो तेव्हा फक्त रेड बॉलमध्ये खेळायचो. त्यामुळे हा फॉरमॅट हृदयाच्या खूप जवळ आहे, इथे खेळताना मला खूप आनंद होतो", असेही सूर्याने म्हटले. अलीकडेच भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यावर भाष्य केले होते. सूर्याला कसोटी क्रिकेटमध्ये संधी द्यायला हवी असे शास्त्री यांनी म्हटले होते. 

सूर्याला कसोटीत संधी द्यायला हवी - शास्त्री शास्त्रींनी सूर्याला कसोटीमध्ये संधी द्यायला हवी असे म्हटले होते, यावर बोलताना सूर्यकुमार म्हणाला, "नक्कीच, या फॉरमॅटमध्येही माझ्या धावा आहेत. मला या फॉरमॅटमध्ये फलंदाजी करताना मजा येते. मी सर्व फॉरमॅटचा खेळाडू आहे. पण कोणतरी याबाबत बोलत आहे हे पाहून आनंद वाटतो. माझ्यासाठी भविष्यात काय आहे ते पाहूया", असे सूर्याने अधिक सांगितले. खरं तर सध्या भारतीय संघ लोकेश राहुलच्या नेतृत्वात बांगलादेशात कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात यजमानांना पराभवाचा धक्का देत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवभारतीय क्रिकेट संघरवी शास्त्रीबीसीसीआयरणजी करंडक
Open in App