Join us
Daily Top 2Weekly Top 5

Suresh Raina Retirement: "प्रिय सुरेश रैना..."; निवृत्तीच्या निर्णयानंतर Yogi Adityanath यांचे विशेष ट्विट

योगी आदित्यनाथ यांनी रैनाला खास संदेश दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 18:21 IST

Open in App

Suresh Raina Retirement, Yogi Adityanath: भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दोन वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणाऱ्या सुरेश रैनाने आज उर्वरित क्रिकेट स्पर्धांनाही रामराम ठोकल्याचे सोशल मीडियावर सांगत निवृत्तीची माहिती दिली. त्याच्या या निर्णयानंतर क्रिकेट जगतातून त्याच्यावर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणाऱ्या संदेशांचा वर्षाव झालाच. पण त्यातही विशेष लक्ष वेधून घेतले ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिक्रियेने. योगी आदित्यनाथ यांनीही त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. सुरेश रैना देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करत होता. त्यामुळे आदित्यनाथ यांनी रैनाला विशेष संदेश दिला.

३५ वर्षीय सुरेश रैनाने निवृत्तीचे ट्विट करत लिहिले की, 'देशासाठी आणि उत्तर प्रदेशसाठी क्रिकेट खेळणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. तसेच, मी BCCI, UP क्रिकेट असोसिएशन, IPL संघ चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजीव शुक्ला यांचेही आभार मानतो. याशिवाय मला पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या सर्व चाहत्यांचेही आभार."

सुरेश रैनाच्या ट्विटला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रिप्लाय केला. "प्रिय सुरेश रैना, आज जरी तू क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केलीस तरी मला वाटतं तुझ्यात अजूनही खूप 'क्रिकेट' शिल्लक आहे. तुझ्या अप्रतिम खिलाडूवृत्तीने तू भारतीय क्रिकेटला नव्या क्षितिजावर नेले आहे. उत्तर प्रदेशला तुझा अभिमान आहे. प्रतिकूल परिस्थितीतही तुझ्या धाडसी खेळीमुळे भारताचा विजय नेहमीच अविस्मरणीय राहिला. असाधारण क्रीडापटू आणि अपवादात्मक सांघिक भावनेने तू देशासाठी कामगिरी केलीस. तुझी कामगिरी आणि क्रिकेट कारकीर्द राज्यातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. आयुष्याच्या नव्या इनिंगसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा!", अशा भावना योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केल्या.

रैना आता IPL आणि देशांतर्गत क्रिकेटही खेळणार नाही!

'मिस्टर आयपीएल' म्हणून प्रसिद्ध असलेला सुरेश रैना यापुढे या प्रतिष्ठित टी२० लीगचा भाग असणार नाही. एवढेच नाही तर तो उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतानाही दिसणार नाही. त्याने उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन (UPCA) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. आता तो परदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसेल अशी अपेक्षा आहे. तसेच, निवृत्त क्रिकेटपटूंच्या 'वर्ल्ड सेफटी सुपर सिरिज'मध्येही रैना भारतीय संघाकडून खेळणार असल्याची माहिती मिळत आहे.

टॅग्स :सुरेश रैनायोगी आदित्यनाथउत्तर प्रदेशभारतीय क्रिकेट संघ
Open in App