भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरील कसोटीच्या तयारीत असताना रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनं कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. दोघांनी अचानक घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याआधी दोघांनी गतवर्षी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यावर छोट्या फॉर्मेटमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला होता. आता या दोघांच्या नजरा २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेवर असतील, असे बोलले जात आहे. यावर लिटल मास्टर सुनील गावसकरांनी मोठं वक्तव्य केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट-रोहितच्या वनडेतील भविष्याबद्दल गावसकरांचे मोठं वक्तव्य
आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा ही २०२७ मध्ये होणार आहे. या स्पर्धेत रोहित-विराट खेळतील का? असा प्रश्न सुनील गावसकर यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना गावसकरांनी दोन्ही क्रिकेटर्सच्या वयाचा दाखला देत मोठे वक्तव्य केले. आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ते दोघे खेळताना दिसणार नाहीत असे गावसकरांनी म्हटले आहे. पण जर दोन वर्षांत त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली तर त्यांना कोणीच रोखू शकणार नाही, असा उल्लेखही यावेळी त्यांनी केला.
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
नेमकं काय म्हणाले गावसकर?
गावसकर म्हणाले आहेत की, दोघांची वनडेतील कामगिरी सर्वोत्तम आहे. पण २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेवेळी निवडकर्ते त्यावेळी ते संघासाठी किती उपयुक्त ठरतील, याचा विचार करतील. त्यांची कामगिरी पाहून निवडकर्ते योग्य तो निर्णय घेतला जाईल. जर निवडकर्त्यांना ते पूर्वीप्रमाणेच योगदान देऊ शकतात याची खात्री असेल तर दोघांनाही निश्चित संघात संधी मिळेल.
सचिनचाही दिला दाखला
वयाच्या पस्तीशीनंतर कोणत्याही खेळाडूसाठी कामगिरीत सातत्य राखणे आव्हानात्मक असते. जर त्यांना वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळायचे असेल तर त्यांनी अधिकाधिक काळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळायला हवे. वयाच्या चाळीशीत शतक मारणं शक्य आहे. ते सचिन तेंडुलकरने दाखवून दिले आहे, असा उल्लेख करत रोहित-विराटला त्यांनी मोलाचा सल्लाही दिला आहे.