ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये अॅडिलेड स्ट्रायकर्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात सुरू असलेल्या लढतीदरम्यान, एक अजब घटना घडली. तसेच त्यामुळे सामनाच रद्द करावा लागला. त्याचं झालं असं की, या सामन्यातील पहिला डाव आटोपल्यानंतर खेळपट्टीवर रोलर फिरवला जात होता. त्याचदरम्यान एक चेंडू रोलरखाली येऊन खेळपट्टीमध्ये रुतला. त्यामुळे खेळपट्टीवर खड्डा पडला. तसेच खेळपट्टी खराब झाल्याने सामना रद्द करावा, लागला. अशा घटनेमुळे क्रिकेटचा सामना रद्द करावा लागण्याची ही पहिलीच वेळ असावी, असे बोलले जात आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शुक्रवार ५ डिसेंबर रोजी जेव्हा हा सामना थांबला तेव्हा अॅडिलेस स्ट्रायकर्सच्या संघाने २० षटकात ४ बाद १६७ धावा केल्या होत्या. तसेच पहिल्या डावानंतर नियमानुसार खेळपट्टीवर रोलर फिरवला जात होता. त्याचदरम्यान, सराव करत असलेल्या काही खेळांडूंचा चेंडू रोलरखाली आला आणि खेळपट्टीमध्ये दाबला गेला. हा रोलर वजनदार असल्याना चेंडू खेळपट्टीत रुतला. तसेच खेळपट्टीवर मधोमध चेंडूच्या आकाराएवढा खड्डा पडला. त्यामुळे खेळपट्टी ही सामना पुढे सुरू ठेवण्यासाठी धोकादायक बनली. अखेरीच पंचांनी हा सामना रद्द करण्याची घोषणा केली.
त्यानंतर अॅडिलेड स्ट्रायकर्सच्या संघाने एक पत्रक प्रसिद्ध करून हा सामना नेमका का रद्द करावा लागला याची माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, चेंडू खेळपट्टीमध्ये रुतल्याने खेळपट्टीची स्थिती पूर्णपणे बदलली होती. अशा खेळपट्टीवर होबार्ट हरिकेन्सच्या संघाल फलंदाजी करायला लावणे योग्य ठरणार नाही, असा निष्कर्ष पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी खेळपट्टीचं निरीक्षण केल्यावर काढला. त्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांशी चर्चा करण्यात आली. तसेच त्यांनीही या निर्णयाशी सहमती व्यक्त केली.