Join us  

स्टीव्ह स्मिथची मोठी आघाडी; कसोटीतील अव्वल स्थान कॅप्टन कोहलीच्या आवाक्याबाहेर

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि गोलंदाज पॅट कमिन्स यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीत आपापल्या अव्वल स्थानावरील पकड आणखी मजबूत केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 2:00 PM

Open in App

दुबई : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि गोलंदाज पॅट कमिन्स यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीत आपापल्या अव्वल स्थानावरील पकड आणखी मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत इंग्लंडवर 185 धावांनी विजय मिळवून 2-1 अशी आघाडी घेतली. या सामन्यात स्मिथ आणि कमिन्स यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

स्मिथने या सामन्यात 211 व 82 धावांची खेळी केली आणि 937 गुणांसह कसोटी फलंदाजांच्या क्रमावारीतील अव्वल स्थानावरील पकड घट्ट केली आहे. डिसेंबर 2017मध्ये स्मिथने 947 गुणांची कमाई केली होती आणि ती त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. स्मिथला हा विक्रम खुणावत आहे. यासह स्मिथने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला खूप मागे टाकले आहे. चौथी कसोटी सुरू असताना स्मिथ ( 904) आणि कोहली ( 903) यांच्यातील गुणांचे अंतर अवघे एक होते. आता ते 34 असे झाले आहे. कोहली 903 गुणांवर राहिला आहे. कमिन्सने चौथ्या कसोटीत 103 धावांत 7 विकेट्स घेतल्या आणि त्याची गुणसंख्या 914 झाली आहे. या कामगिरीसह त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राच्या विक्रमाशी बरोबरी केली. मॅकग्राने 2001मध्ये 914 गुणांची कमाई करत ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी गोलंदाजाची नोंद केली होती. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा 851 गुणांसह दुसऱ्या, तर भारताचा जसप्रीत बुमराह 835 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. जोस हेझलवूडनेही कारकिर्दीत प्रथमच अव्वल दहामध्ये स्थान पटकावले आहे. त्याने 4 स्थानांच्या सुधारणेसह 8व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. बांगलादेशवर ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या अफगाणिस्तान संघाच्या खेळाडूंनीही क्रमवारीत सुधारणा केली आहे. माजी कर्णधार असघर अफगाणने या सामन्यात 92 व 50 धावा केल्या आहे आणि त्याने 110व्या क्रमांकावरून 63व्या स्थानी झेप घेतली आहे. रहमत शाहनं शतकी खेळीकरून 93 वरून 65 व्या स्थानी झेप घेतली. कर्णधार रशीद खानने 69वरून 37व्या स्थानी, तर अष्टपैलू मोहम्मद नबीनं 21 स्थानांच्या सुधारणेसह 85व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.   

टॅग्स :आयसीसीस्टीव्हन स्मिथविराट कोहलीअ‍ॅशेस 2019आॅस्ट्रेलियाइंग्लंडअफगाणिस्तानबांगलादेश