Rajat Patidar And Yash Rathore Hit Centuries In The Final Of Duleep Trophy : एका बाजूला आशिया कप स्पर्धेची चर्चा रंगत असताना दुसऱ्या बाजूला देशांतर्गत स्पर्धेतील प्रतिष्ठित अशा दुलीप करंडक स्पर्धेतील फायनलचा थरार सुरु झाला आहे. बंगळुरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स स्टेडियमवर दक्षिण विभाग (South Zone) आणि मध्य विभाग (Central Zone) यांच्यात फायनलचा सामना रंगला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मध्य विभाग संघाची सामन्यावर मजबूत पकड
या सामन्यात दक्षिण विभागाच्या संघाला पहिल्या डावात फक्त १४९ धावांत आटोपल्यावर मध्य विभागाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली असून दुसऱ्या दिवसाअखेर त्यांनी २०० पारची आघाडी घेत सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. मध्य विभाग संघाकडून कर्णधार रजत पाटीदारसह यश राठोडनं शतकी खेळी करत प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटवर ढकलले आहे.
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
कॅप्टन रजत पाटीदारसह यश राठोडचा शतकी तोरा
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात १७ वर्षांचा दुष्काळ संपवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला IPL चॅम्पियन करणारा रजत पाटीदार याने आता मध्य विभाग संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी शड्डू ठोकलाय. दक्षिण विभागाचा डाव अवघ्या १४९ धावांवर आटोपल्यावर मध्य विभाग संघाचे नेतृत्व करणाऱ्या रजत पाटीदारनं ११५ चेंडूत शतक झळकावले. या खेळीत त्याच्या भात्यातून १२ चौकार आणि २ गगनचुंबी षटकार पाहायला मिळाले. त्याच्याशिवाय यश राठोडनंही शतकी डाव साधला. दुसऱ्या दिवसाअखेर तो १८८ चेंडूचा सामना करून १३७ धावांवर नाबाद खेळत होता. या दोघांच्या शतकाच्या जोरावर दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी मध्य विभाग संघाने ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३८४ धावा करत फायनल लढतीत २३५ धावांची भक्कम आघाडी घेतली होती. रजतचा संघ 'सुवर्ण' डाव साधत जेतेपदाचा डाव साधण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे.
भारतीय संघात संधी मिळाली, पण...
IPL मध्ये कॅप्टन्सीत छाप सोडल्यावर रजत पाटीदार आता देशांतर्गत स्पर्धेतही नेतृत्वासह आपल्या फलंदाजीतील कर्तृत्व सिद्ध करून दाखवतोय. टीम इंडियाकडून त्याला ३ कसोटी सामन्यात संधी मिळाली आहे. यात त्याने ६ डावात ६३ धावा केल्या आहेत. २०२४ मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता त्यावेळी त्याला कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली होती. पण त्यानंतर तो संघाबाहेर पडला. देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीसह तो पुन्हा एकदा टीम इंडियाचे दरवाजे ठोठावताना दिसतोय. घरच्या मैदानात रंगणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची डाळ शिजणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: South Zone vs Central Zone Rajat Patidar And Yash Rathore Hit Centuries In The Final Of Duleep Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.