वर्ल्डकपच्या शेवटच्या साखळी सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 10 धावांनी मात केली आहे. यामुळे भारताने गुणतक्त्यामध्ये पहिले स्थान पटकाविले असून सेमीफायनलमधील सामनाही कोणत्या संघासोबत होणार हे पक्के झाले आहे.
आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 325 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने शेवटच्या ओव्हरपर्यंत कडवी झुंझ देत 315 धावांवर ऑलआऊट झाली. यामुळे आजच्या भारत-श्रीलंका सामन्यात श्रीलंकेवर सात गड्यांनी विजय मिळवत भारताने गुणतक्त्यामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा दुसरा क्रमांक आहे.
यापूर्वी 13 जूनला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. यामुळे वर्ल्डकपमधील ही या दोन संघांमधील पहिलीच लढत असणार आहे.