आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो, असे अंदाज बांधले जात आहेत. ३७ वर्षीय रोहित शर्माने गेल्या वर्षी २०२४ च्या टी-२० विश्वचषकातील विजयानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आताही असे काही होऊ शकते, असे अंदाज बांधले जात आहेत. मात्र, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी, यावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली अजिबात सहमत नाही.
रोहित शर्माने निवृत्ती घ्यायला हवी? -यासंदर्बात मांध्यमांसोबत बोलताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला, "रोहित शर्माने काही महिन्यांपूर्वीच आयसीसी पुरस्कार जिंकला आहे. त्याचा आदर राखला जायला हवा. रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा का होते आहे? हा प्रश्नच का उपस्थित होत आहे? त्याने काही महिन्यांपूर्वीच वर्ल्ड कप (T20)जिंकला आहे."
गांगुली पुढे म्हणाला, "निवडकर्तेय काय विचार करत आहेत, मला माहीत नाही. मात्र, रोहित शर्मा अत्यंत चांगले खेळत आहे. न्यूझिलंडच्या तुलनेत भारत फार चांगला आहे. भारत 2023 वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळला, 2024 टी-20 वर्ल्ड कप जिंकला आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अद्यापही अजेय आहे आणि आता अंतिम सामना खेळेल." चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील भारताच्या शक्यतेसंदर्भात विचारले असता, भारत हा या सामन्यातील प्रबळ दावेदार असल्याचे गांगुलीने म्हटले आहे.
गांगुली म्हणाल, "भारत हा एक प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियामतील प्रत्येक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रोहित शर्मा आणि केएल राहुल, सर्वच जण चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. हा एक चांगला सामना असेल. भारताची गोलंदाजीही लाइनअप खूप मजबूत आहे." जर रोहित शर्माने रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी उचलली, तर तो सौरव गांगुली आणि एमएस धोनीनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा तिसरा भारतीय कर्णधार बनेल.