भारतीय संघाचा धडाकेबाज माजी कप्तान सौरव गांगुलीच्या कारला दुर्गापूर एक्स्प्रेस वेवर मोठा अपघात झाला. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गांगुली बर्दवानला जात होते. यावेळी त्यांच्या कारसमोर अचानक एक ट्रक लेन तोडून आला. यामुळे कारचालकाने ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या कार एकमेकांवर आदळल्या. यात गांगुलीच्या कारलाही धडक बसली.
गांगुलीच्या कारसोबत सुरक्षा रक्षकांचा ताफा होता. या ताफ्यातील कार एकमेकांवर आदळल्या. परंतू, कोणाला दुखापत झाली नाही. गांगुलीच्या ताफ्यातील दोन गाड्यांना मोठे नुकसान झाले आहे, असे सांगितले जात आहे.
गांगुलीलाही थोडा मुका मार लागला. अपघातानंतर जवळपास १० मिनिटे सौरव तिथे होता. यानंतर मागाहून येणाऱ्या एका कारमध्ये बसून तो कार्यक्रमाला निघून गेला. बर्दवान विश्वविद्यालयात हा कार्यक्रम होता.
सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष आहेत.भारतीय क्रिकेटमधील सर्वात आक्रमक आणि प्रभावशाली कर्णधारांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे. सौरवच्या नेतृत्वात भारतीय संघाने परदेशात चमकदार कामगिरी केली आणि अनेक ऐतिहासिक विजयांची नोंद केली. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने २००२ चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला आणि २००३ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
दीड महिन्यांपूर्वी मुलीच्याही कारला अपघात...
साधारण दीड महिन्यांपूर्वी, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सना गांगुलीच्या कारलाही असाच अपघात झाला होता. एका सुसाट असलेल्या बसने तिच्या कारला ठोकर दिली होती. कोलकाता शहरातील डायमंड हार्बर रोडवर हा अपघात झाला होता. बसचा चालक पळून गेला होता. पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर या बेपत्ता चालकाला शोधले होते.