Pulwama Attack Martyr Son Selected For U19 Team : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी हा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवानांना हौतात्म्य आले होते. या हल्ल्यानंतर, भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या जवानाच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली होती. आता सेहवागने एक आनंदाची बातमी दिली आहे. पुलवामा हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या एका जवानाच्या मुलाची अंडर-१९ संघात निवड झाली आहे. हा मुलगा खद्द सेहवागच्याच शाळेत शिकतो.
सेहवागने १४ फेब्रुवारीला सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि दुःख व्यक्त केले. या पोस्टबरोबरच पुलवामा हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या विजय सोरेंग यांचा मुलगा राहुल सोरेंग याची हरियाणाच्या १९ वर्षांखालील संघात निवड झाल्याची माहितीही सेहवागने दिली.
सेहवागने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, "दुःखद दिवसाला 6 वर्ष झाली. आपल्या वीर जवानांच्या बलिदानाची भरपाई कुठल्याही पद्धतीने होऊ शकत नाही. मात्र, हुतात्मा विजय सोरेंग यांचा मुलगा राहुल सोरेंगे आणि हुतात्म राम वकील यांचा मुलगा अर्पित सिंह गेल्या 5 वर्षांपासून सेहवाग इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहेत. राहुलची नुकतीच हरियाणाच्या अंडर 19 संघात निवड झाली आहे. सर्व वीर जवानांना नमन."
हरियाणाच्या अंडर-19 संघात निवड झालेला राहुल सोरेंग हा मुळचा झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील आहे. राहुलचे वडील विजय सोरेंग हे सीआरपीएफच्या 82व्या बटालियनमध्ये हेड काँस्टेबल होते. विजय सोरेंग हे 1993 मध्ये सैन्यात भरती झाले होते.