भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि बॉलिवूडचा संगीत दिग्दर्शक-चित्रपट निर्माते पलाश मुच्छल यांच्या बहुचर्चित नात्याला आता अधिकृत दुजोरा मिळाला आहे. पलाश मुच्छल यांनी थेट स्मृती मानधना यांच्याशी असलेल्या त्यांच्या संबंधांबद्दल बोलताना लग्नाची घोषणा केली आहे.
इंदूर येथील एका कार्यक्रमात राज्य पत्रकार परिषदेत बोलताना पलाश मुच्छल यांना स्मृती मानधना यांच्याबद्दल विचारणा करण्यात आली. दोघांच्या नात्याबद्दल मीडियामध्ये सुरू असलेल्या चर्चांना विराम देत मुच्छल यांनी एक मोठी बातमी दिली.
'ती लवकरच इंदूरची सून होईल!'
“ती (स्मृती मानधना) लवकरच इंदूरची सून होणार आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे. तुम्हाला ही बातमी हेडलाईनसाठी पुरेशी आहे”, असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुच्छल यांनी उत्तर दिले.
पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांचे अनेक वर्षांपासून डेटिंग सुरू असल्याच्या चर्चा होत्या. सोशल मीडियावरही दोघांचे फोटो अनेकदा एकत्र दिसले आहेत. मात्र, दोघांनीही आजपर्यंत सार्वजनिकरित्या कधीही त्यांच्या नात्याला दुजोरा दिला नव्हता. आता पलाश मुच्छल यांच्या या घोषणेमुळे क्रिकेट आणि बॉलिवूडच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा समीकरण जुळणार आहे. परंतू, हे समीकरण नवरी मुलगी क्रिकेटर आणि नवरदेव बॉलिवूडकर असे उलटे असणार आहे.