Smriti Mandhana Started Training : भारतीय महिला संघाची वर्ल्ड चॅम्पियन उप कर्णधार स्मृती मानधना पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत असल्यामुळे टीम इंडियाची क्वीन श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. जे काही झालं ते सर्व मागे टाकून स्मृती मानधना कणखर मानसिकतेसह पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास तयार आहे. सोशल मीडियावर तिचा सरावादरम्यानचा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमुळे २१ डिसेंबरपासून रंगणाऱ्या टी-२० मालिकेसाठी ती भारतीय संघातील निवडीसाठी उपलब्ध असल्याचे संकेत मिळत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लग्नात विघ्न! स्मृतीनं इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून शेअर केली त्यासंदर्भातील गोष्ट
महिला वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि बॉलिवूडमधील संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाचा विषय चर्चेचा विषय ठरला. लग्नात विघ्न आल्यावर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. सरशेवटी या दोघांनी लग्नाचा विषय संपवत आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याची गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली. स्मृतीनं यासंदर्भात एक खास पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने लिहिले होते की, “माझा विश्वास आहे की, आपल्यापैकी प्रत्येकाचे एक मोठं उद्दिष्ट असतं. माझ्यासाठी ते म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व करणं आहे. मी शक्य तितक्या काळ माझ्या देशासाठी खेळत राहू इच्छिते. माझं लक्ष कायम क्रिकेटवरच असेल.” लग्नाचा विषय इथेच संपवूया दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा सन्मान कराल अशी अपेक्षा, अशा शब्दांत तिने आम्हाला पुढे जाण्याची संधी द्या, अशी विनंती केली होती.
आयुष्यातील कठीण प्रसंगी मैत्रीणींची साथ; कणखर मानसिकतेसह 'रन'रागीणी पुन्हा मैदानात उतरण्यास सज्ज
स्मृती मानधनाच्या वैयक्तिक आयुष्यात अचानक आलेल्या वादळानंतर संघातील मैत्रीणींनी तिला साथ दिली. जेमिमा रॉड्रिग्जनं तर ऑस्ट्रेलियन लीगमध्ये न खेळता स्मृती मानधनासोबत थांबण्याला पसंती दिल्याचा विषयही चांगलाच गाजला होता. अरुंद्धती रेड्डी राधा यादव आणि श्रेंयका पाटील यासह अन्य सहकारी खेळाडूंनी तिला मानसिक आधार दिला. आता स्मृती पुन्हा एकदा कणखर मानसिकतेसह मैदानात उतरण्यास सज्ज आहे.