SMAT Final 2025 Jharkhand Captain Ishan Kishan Brings Up A Quick Fire Fifty Against Jharkhand : पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात रंगलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत झारखंडचा कर्णधार ईशान किशन याने धमाकेदार खेळीचा नजराणा पेश केला. बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाबाहेर असलेल्या विकेट किपर बॅटरनं BCCI निवडकर्त्यांसमोर चौकार षटकारांची बरसात करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. हरयाणाविरुद्धच्या अंतिम सामन्यात ईशान किशन याने डावातील २४ व्या चेंडूवर खणखणीत चौकार मारत अर्धशतक पूर्ण केले. त्याची ही खेळी ६ षटकार आणि २ चौकारांनी बहरलेली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
झारखंड आणि हरयाणा हे दोन्ही संघ पहिली वहिली ट्रॉफी उंचावण्याच्या इराद्याने पुण्याच्या मैदानात उतरले आहेत. हरयाणाचा कर्णधार अंकित कुमार याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट सिंहच्या रुपात झारखंडच्या संघाने स्वस्तात पहिली विकेट गमावली. पण त्यानंतर ईशान किशन याने तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत हरयाणाच्या गोलंदाजांचे अक्षरश: खांदे पाडले. त्याला दुसऱ्या बाजूनं कुमार कुशाग्रनं उत्तम साथ दिली. दोघांनी शतकी भागीदारीसह संघाच्या धावफलकावर मोठी धावसंख्या लावली.
कुमार कुशाग्रनंही साजरे केले अर्धशतक
ईशान किशन याने अर्धशतक साजरे केल्यावर कुमार कुशाग्रनंही गियर बदल फलंदाजी करत यंदाच्या स्पर्धेतील चौथ्या अर्धशतकाला गवसणी घातली. १० व्या षटकात तो २५ चेंडूत ३९ धावांवर खेळत होता. ११ व्या षकात पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यावर चौथ्या चेंडूवर चौकार मारत त्याने २८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले.