Join us

Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

Mohammed Siraj, IND vs ENG 5th Test : सिराजने पाच विकेट घेत भारताला मिळवून दिला रोमांचक विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 17:15 IST

Open in App

Siraj, IND vs ENG 5th Test Day 5 Live: भारतीय संघाने इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत रोमांचक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २२४ धावा केल्या तर प्रत्युत्तरात इंग्लंडने २४७ धावा केल्या. त्यानंतर भारतान दुसऱ्या डावात ३९६ धावा करत इंग्लंडला ३७४ धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरूवात केली होती. पण नंतर हॅरी ब्रूक आणि जो रूट यांच्या शतकांनी सामना फिरला. इंग्लंडला आजच्या दिवशी विजयासाठी ३५ धावांची गरज होती तर भारताला ४ विकेट्सची गरज होती. अशावेळी भारतीयांनी भेदक मारा करत, मोहम्मद सिराजने ३ आणि प्रसिद्ध कृष्णाने १ बळी घेतला आणि भारताला अवघ्या ६ धावांनी विजय मिळाला. या रोमांचक विजयानंतर सिराजने आपल्या भावना व्यक्त केल्या.

"आम्ही जिंकलोय याचा मला खूप आनंद आहे. मला माझ्या भावना शब्दांत मांडता येऊ शकत नाहीत. काल जेव्हा माझ्याहातून कॅच सुटला, तेव्हा मला वाटलं होतं की सामना आमच्या हातून निसटला. कारण काल जर त्यावेळी हॅरी ब्रूक आउट झाला असता तर आम्ही खूप आधीच जिंकलो असतो. पण ब्रूकच्या विकेटनंतरही आम्ही जो कमबॅक केला, त्यामुळे आम्हाला आनंद वाटला. कालच्या चुकीनंतर मी आज सकाळी उठलो आणि गुगलवरून Believe म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवण्याचा फोटो डाऊनलोड केला आणि तो मोबाईलच्या वॉलपेपरवर लावून मनाशी ठरवलं की मी हे नक्कीच करू शकतो. आमचा आमच्या संघावर विश्वास होता. त्यामुळेच आम्ही सामना जिंकलो. आणि त्याचा आम्हा सर्वांना खूप आनंद आहे," असे सिराज म्हणाला.

गोलंदाजी करताना काय प्लॅन होता?

"मी जेव्हा गोलंदाजीला आलो तेव्हा मी ठरवलं होतं की मी जास्त वेगळं काहीही करण्याचा प्रयत्न करणार नाही. मी एकाच टप्प्यावर गोलंदाजी करत राहिलो. कारण आज चेंडू खूप चांगल्या पद्धतीने स्विंग होत होता. त्यामुळेच आम्हाला हे यश मिळाले. आजची ही मालिका अनिर्णित राहिली असली तरीही आमच्यासाठी हा एक मोठा विजय आहे," अशा शब्दांत सिराजने विजयाचे वर्णन केले.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५मोहम्मद सिराजभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघइंग्लंड