भारतीय संघाला टी-२० मध्ये वर्ल्ड चॅम्पियन करणारा कर्णधार रोहित शर्मानं छोट्या फॉरमॅटसह मोठ्या फॉरमॅटमधूनही निवृत्ती घेतली आहे. टी-२० आणि कसोटी संघातून निवृत्ती घेतल्यानंतर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून एकदिवसीय संघाचे नेतृत्व करत पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरी फिल्डबाहेरील एक झलक तो चर्चेत येण्यासाठी पुरेशी ठरते.
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं आपल्या चाहत्यांना हातजोडून केली विनंती
मुंबईच्या रस्त्यावरून अलिशान कारमधून फेरफटका मारताना स्पॉट झाल्यानंतर आता हिटमॅनचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील खासियत ही की, बाप्पासमोर दर्शन घेताना रोहित शर्मानं IPL मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना मिळालेल्या नावासह जयघोष करणाऱ्या चाहत्यांसमोर हात जोडून विनंती केल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्माच्या व्हायरल व्हिडिओसह इथं जाणून घेऊयात नेमकं काय घडलं त्यासंदर्भातील सविस्तर...
नेमकं काय घडलं? इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
एका बाजूला ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी सुरु असताना दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा कुटुंबियासोबतही वेळ घालवताना दिसतोय. रोहित शर्माचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यात रोहित शर्मा एका गणेश मंडळातील बाप्पाच्या दर्शनासाठी पोहचल्याचे दिसते. हिटमॅनची झलक दिसताच चाहत्यांनी 'मुंबईचा राजा... रोहित शर्मा' अशी घोषणाबाजी सुरु केली. स्टेडियम अन् बाप्पाच्या मंडप ही दोन वेगळी ठिकाणे आहेत. इथं अशी घोषणाबाजी करणं योग्य नाही, हे तारतम्य दाखवून देत रोहितनं चाहत्यांना हात जोडून अगदी नम्रपणे घोषणाबाजी थांबवण्याची विनंती केली. त्याच्या शब्दाला चाहत्यांनीही मान दिला. रोहितची ही कृती त्याच्यातील साधेपणाचं दर्शन घडवून देणारी होती, अशा आशयाच्या कमेंट्सह हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
IPL मध्ये मिळालं नाव; हिटमॅननं अगदी आनंदानं स्वीकारलं, पण...
३८ वर्षीय क्रिकेटर IPL मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळतो. या फ्रँचायझी संघाला त्याने विक्रमी पाच वेळा IPL चॅम्पियन केले आहे. मुंबई इंडियन्सला फॉल करणाऱ्या चाहत्यांमध्ये रोहित शर्माचा मोठा चाहता वर्ग आहे. या संघाकडून खेळताना रोहितला 'मुंबईचा राजा' हे नाव मिळालं आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर मुंबई इंडियन्सच्या संघानं वानखेडेच्या घरच्या मैदानातील IPL २०२५ च्या सामन्यात 'मुंबईचा राजा' असं नाव छापलेल्या जर्सी चाहत्यांना गिफ्ट स्वरुपात देत रोहित शर्माचा हटके अंदाजात सन्मान केला होता. मुंबईकर क्रिकेटरनंही अगदी आनंदानं हे सगळं स्वीकारलं. पण गणेशोत्सवातील मंडळाच्या भेटीत ही घोषणा बाजी नको, असे म्हणत त्यानं बाप्पा बद्दलचा मनातील भाव जपल्याचे पाहायला मिळाले. गणशोत्सव साजरा करत असताना अनेक मंडळात बाप्पाला राजा या नावानं ओळखलं जातं. त्यामुळेच रोहित शर्मानं चाहत्यांना बाप्पाच्या मंंडपात हा जयघोष नको, अशी विनंती केल्याचे दिसून आले.