ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी BCCI ने जाहीर केलेल्या भारतीय संघावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. संघात निवडलेल्या सर्व १५ खेळाडूंवर कोणाचा आक्षेप नाही, परंतु १-२ खेळाडूंच्या जागी दुसऱ्यांनी संधी नक्की देता आली असती असे अनेकांचे मत आहे. रिंकू सिंगला न निवडण्यावरून वाद पेटलाच आहे, तर हार्दिक पांड्याची कामगिरी काहीच नसताना त्याला पूर्वपुण्याईवर निवडल्याची चर्चा आहे. सलामीसाठी रोहित शर्मासोबत यशस्वी जैस्वालला प्राधान्य देण्यावरही नाराजी आहे. त्यात राखीव खेळाडूंमध्ये शुबमन गिलचं नाव पाहून १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूने तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडसाठी बॅटिंग केली आहे.
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ निवड जाहीर होण्यापूर्वी अनेक नावं चर्चेत होती, परंतु ऋतुराज गायकवाड हे नाव कुठेच नव्हतं. सलामीसाठी विराट कोहली, लोकेश राहुल, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, इशान किशन, अभिषेक शर्मा हे या शर्यतीत होते. पण, यापैकी विराट, यशस्वी, शुबमन ( राखीव खेळाडू) हे अमेरिकेला जाणार आहेत. आयपीएल २०२४ मध्ये विराटनंतर ( ५००) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ऋतुराज येतो... त्याने चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळलेही आणि फलंदाजीत ९ सामन्यांत ६३.८६ च्या सरासरीने ४४७ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. असे असूनही राखीव खेळाडूंमध्येही त्याचा विचार केला गेला नाही.
ऋतुराजने १९ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १ शतक व ३ अर्धशतकांसह ५०० धावा केल्या आहेत. शुबमन गिलने १४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १ शतक व १ अर्धशतकासह ३३५ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२४ मध्ये त्याने १० सामन्यांत ३२० धावा केल्या आहेत.