मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलनं हवा केली. त्याचं शतक अवघ्या १० धावांनी हुकलं. पण त्याने केलेली ही खेळी "सारा जमाना शुबमन का दिवाना" असा सीन क्रिएट करणारी होती. कारण भारतीय संघ संकटात सापडला असताना त्याच्या भात्यातून ९० धावांची खेळी पाहायला मिळाली. त्यामुळेच त्याची ही इनिंग शतकापेक्षाही मौल्यवान ठरते. या खेळीसह भारताच्या युवा सलामीवीरानं अनुभवी कसोटीपटू चेतेश्वर पुजाराला मागे टाकण्याचा पराक्रमही करून दाखवला आहे.
WTC मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शुबमन गिलची एन्ट्री
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शुबमन गिल आता चौथ्या स्थानावर पोहचला आहे. पुजाराला मागे टाकून त्याने या क्रमांकावर झेप घेतलीये. भारतीय कसोटी संघाबाहेर असलेल्या पुजारानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत एकूण १७६९ धावा केल्या आहेत. या यादीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा २६७४ धावांसह सर्वात आघाडीवर आहे. कोहलीनं २४२६ धावा केल्या असून रिषभ पंतच्या खात्यात १९३३ धावांची नोंद आहे. शुबमन गिलच्या खात्यात आता १७८९ धावांची नोंद झाली आहे.
आघाडीच्या ५ फलंदाजांचा रेकॉर्ड
पंतसोबत दमदार भागीदारीसह शुबमन गिलनं न्यूझीलंड संघाला ढकलले बॅकफूटवर
भारतीय संघाने पहिल्या दिवसाच्या खेळातच ४ विकेट्स गमावल्या होत्या. दुसऱ्या दिवसाच्या खेळात शुबमन गिलवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. त्यानेही चाहत्यांना अजिबात निराश केले नाही. कठीण परिस्थितीत त्याने ९० धावांची खेळी करून टीम इंडियाचा डाव सावरला. पंतसोबत त्याने पाचव्या विकेटसाठी केलेली ९५ धावांची भागीदारी टीम इंडियासाठी खूपच मोलाची आणि सामन्याला कलाटणी देण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी आहे.