Join us

शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'

Shubman Gill : आता गिल इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडूने बनला आहे. त्याने तब्बल ४६ वर्षांपूर्वीचा सुनील गावसकर यांचा महा विक्रम मोडला आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 22:17 IST

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे इतिहास रचला. दमदार कामगिरी करत गिलने सुनील गावसकर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि रवि शास्त्री यांना मागे टाकले. आता तो इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडूने बनला आहे. त्याने तब्बल ४६ वर्षांपूर्वीचा सुनील गावसकर यांचा महा विक्रम मोडला आहे.

सुनील गावसकर यांचा विक्रम तुटला - माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर यांनी १९७९ मध्ये द ओव्हल येथे २२१ धावांची खेळी केली होती. याशिवाय राहुल द्रविडने २००२ मध्ये द ओव्हल येथेच २१७ धावा फटकावल्या होत्या. या यादीत पुढचे नाव क्रिकेटचा देव म्हणवल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे आहे, त्याने २००२ मध्ये लीड्स येथे १९३ धावांची खेळी केली होती. तर रवी शास्त्री यांनीही ओव्हल येथे १९९० मध्ये शानदार फलंदाजी करत १८७ धावा केल्या होत्या. आता शुबमन गिलने या सर्वांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे. त्याने इंग्लंडच्या सर्वच गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली.

शुबमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच २०० धावांचा टप्पा ओलांडला. या खेळीत त्याने २६९ धावा कुटल्या. त्याच्या फलंदाजीचे सर्व जण कौतुक करत आहेत. या सामन्यात त्याने यशस्वी जयस्वालसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची मौल्यवान भागीदारी केली. यानंतर, ऋषभ पंत आणि गिल यांनी चौथ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. या सामन्यात शुबमन गिल व्यतिरिक्त अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजानेही शानदार कामगिरी केली आणि ८९ धावा केल्या. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी २०३ धावा जोडल्या.

शुबमन गिलने अनेक विक्रम केले - बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात स्टार फलंदाज शुबमन गिलने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. यात, शुबमन भारतीय कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा तिसरा खेळाडू बनला आहे. तो आता कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या सर्वात तरुण भारतीय खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. भारतीय कर्णधार म्हणून कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून मन्सूर अली खान पतौडी यांचे नाव आहे. त्यांनी २३ वर्षे ३९ दिवसांचे असताना द्विशतक झळकावले होते. गिलने २५ वर्षे २९८ व्या दिवशी ही कामगिरी केली.

महत्वाचे म्हणजे, शुबमन गिल हा SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) द्विशतक झळकावणारा पहिलाच आशियाई कर्णधार ठरला आहे. यापूर्वी, SENA देशांमध्ये आशियाई कर्णधाराचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानच्या नावावर होता, त्याने २०११ मध्ये १९३ धावा केल्या होत्या. परदेश दौऱ्यावर भारतीय कर्णधाराने केलेले हे दुसरे द्विशतक आहे. यापूर्वी, केवळ विराट कोहलीनेच अशी कामगिरी केली आहे.

टॅग्स :शुभमन गिलरवींद्र जडेजासुनील गावसकरसचिन तेंडुलकरराहुल द्रविडरवी शास्त्रीभारत विरुद्ध इंग्लंडइंग्लंड