म्हैसूर : शुभमन गिलच्या ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर ३ बाद २३३ धावांची मजल मारली.
सलामीवीर फलंदाज गिलने १२ चौकार व १ षटकार लगावला. त्याचे शतक ८ धावांनी हुकले. यापूर्वी पहिल्या सामन्यातही तो ९० धावा काढून बाद झाला होता. भारतीय संघातून बाहेर असलेला करुण नायर ७८ आणि रिद्धिमान साहा ३६ धावा काढून खेळपट्टीवर आहेत. अंधुक प्रकाशामुळे आज केवळ ७४ षटकांचा खेळ शक्य झाला.
प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेल्या भारत ‘अ’संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर फलंदाज अभिमन्यू ईश्वरन पाच धावा काढून सहाव्या षटकात लुंगी एंगिडीच्या चेंडूवर पायचित झाला. गुजरातचा फलंदाज प्रियांक पांचलने ३९ षटके खेळपट्टीवर तळ ठोकला, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो बाद झाला त्यावेळी भारत ‘अ’ संघाची २ बाद ३१ अशी स्थिती होती.
वेर्नोन फिलँडरच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक मारा केली. गिलने फिरकीपटू डेन पीटला समर्थपणे तोंड दिले. त्याने नायरसोबत तिसºया विकेटसाठी ३४ षटकांत १३५ धावांची भागीदारी केली. गिल लुथू सिपाम्लाच्या चेंडूवर सेनुरान मुथुस्वामीला झेल देत माघारी परतला. नायरने साहासोबत चौथ्या विकेटसाठी ६७ धावांची अभेद्य भागीदारी केली. (वृत्तसंस्था)