भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने मार्च २०२५ चा आयसीसी पुरुष प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे. न्यूझीलंडच्या जेकब डफी आणि रचिन रवींद्र यांच्याची त्याची स्पर्धा होती. नुकतीच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताचे नाव कोरण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. फेब्रुवारीनंतर मार्च महिन्यातही आयसीसी प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार भारताकडेच आला आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात भारताचा सलामीवीर शुभमन गिलची प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली.
श्रेयस अय्यरने दुसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे. याआधी भारताकडून फक्त शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांनीच दोन किंवा त्याहून अधिक वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. आयसीसी प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार जिंकल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला की, 'आयसीसीने प्लेअर ऑफ मंथ या पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल मला अभिमानास्पद वाटत आहे. हा सन्मान खूप खास आहे. विशेष म्हणजे, या महिन्यात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, हा क्षण कायम माझ्या स्मरणात राहील. इतक्या मोठ्या व्यासपीठावर भारताच्या यशात योगदान देणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. माझ्या संघातील सहकारी, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी त्यांचे आभारी आहे.'
श्रेयस अय्यरने मार्च महिन्यात एकूण ३ एकदिवसीय सामने खेळले, ज्यात ५७.३३ च्या सरासरीने १७२ धावा केल्या. या काळात, त्याने ग्रुप अ सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ७९ धावा, सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४५ धावा आणि फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ४८ धावा केल्या, ज्यामुळे भारत विजेता बनला.
सध्या श्रेयस अय्यर आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जच्या संघाचे नेतृत्व करत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबने पाच पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. गुणतालिकेत पंजाबचा संघ ६ गुणांसह सहाव्या स्थानकावर आहे. पंजाबला त्यांच्या गेल्या सामन्यात हैदराबादकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पंजाबचा संघ आज कोलकात्याशी भिडणार आहे. या सामन्यात पंजाबचा संघ पुनरागमनसाठी मैदानात उतरेल.