ICC T20 Ranking - भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ३-० असे निर्विवाद वर्चस्व गाजवले. या मालिकेत मधल्या फळीचा फलंदाज श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याची बॅट चांगलीच तळपली. २७ वर्षीय श्रेयसने १७४च्या स्ट्राईकरेटने २०४ धावा केल्या. श्रीलंकेला एकदाही श्रेयसला बाद करता आले नाही. या मालिकेतील दमदार कामगिरीच्या जोरावर श्रेयस अय्यरने आयसीसी ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत २७ स्थानांची झेप घेतली आहे. श्रेयस आता १८व्या क्रमांकावर आला आहे, तर गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार तीन स्थानांच्या सुधारणेसह १७व्या क्रमांकावर आला आहे.
पण, भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी ही मालिका वैयक्तिक कामगिरीसाठी खास राहिलेली नाही. त्यामुळे दोन स्थानांनी घसरण होऊन तो १३ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याला ५० धावा करता आल्या. श्रीलंकेच्या पथून निसांका याहे दुसऱ्या सामन्यात ७५ धावांची खेळी केली होता. त्यानेही ६ स्थानांच्या सुधारणेसह ९वा क्रमांका पटकावला आहे. या मालिकेत विश्रांती घेणाऱ्या विराट कोहलीला टॉप टेनमधून बाहेर जावे लागले आहे. विराट ५ स्थानांच्या घसरणीसह १५व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
कसोटी क्रमावारीत दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने मोठी झेप घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील कामगिरीनंतर रबाडा कसोटी गोलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. रबाडाने दोन सामन्यांच्या मालिकेत १० विकेट्स घेतल्या. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ६० धावांत ५ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडचा गोलंदाज कायले जेमिन्सन याची दोन स्थानांनी, तर टीम साऊदीची एका स्थानाने घसरण झाली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स व भारताचा आर अश्विन आघाडीवर आहेत.