सिडनी: भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याच्या दुखापतीबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान झेल घेताना बरगडीखाली बसलेल्या मारामुळे तो सामना सोडून ड्रेसिंग रुममध्ये गेला होता. परंतू, तिथेच तो बेशुद्ध पडल्याचे समोर आले आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या लागलीच धोका लक्षात आल्याने तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले अन्यथा जिवावर बेतले असते.
गेले दोन दिवस सिडनी येथील रुग्णालयात ICU मध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरच्या दुखापतीची गंभीरता आता समोर आली आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात बॅकवर्ड पॉइंटवरून मागे धावत जाऊन झेल घेण्याच्या प्रयत्नात श्रेयस अय्यरच्या डाव्या बरगडीच्या खालच्या भागाला जोराचा मार लागला होता. एवढा की अय्यरला मैदानात रडू आले होते. ही दुखापत इतकी गंभीर होती की, ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्यानंतर तो तात्काळ बेशुद्ध झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयसच्या अंतर्गत स्कॅनमध्ये त्याला आंतरिक रक्तस्राव झाल्याचे आणि त्याच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हा मार जीवघेणा ठरू शकला असता. मात्र, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्वरित केलेल्या तपासणीमुळे आणि त्याला लगेच रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले.
श्रेयसची सद्यस्थिती:
माध्यमांच्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरला आता ICU मधून बाहेर काढण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे, पण अजूनही तो डॉक्टरांच्या कडक निगराणीखाली आहे. त्याचे आई-वडील त्याला भेटण्यासाठी सिडनीला जाण्याची शक्यता असून, त्यांनी तातडीच्या व्हिसासाठी अर्ज केला आहे. श्रेयस अय्यरला पूर्णपणे फिट घोषित केल्यानंतरच तो भारतात परतेल. बीसीसीआयची वैद्यकीय टीम सिडनी आणि भारतातील तज्ज्ञांच्या संपर्कात असून, त्याच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.