Shreyas Iyer Injury Update: भारतीय संघाचा एकदिवसीय उपकर्णधार श्रेयस अय्यर याला सिडनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरी याचा झेल पकडताना श्रेयसच्या बरगडीला दुखापत झाली. त्यामुळे त्याला अंतर्गत रक्तस्त्राव होऊ लागला. परिणामी, त्याला रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तशातच आता नव्याने आलेल्या अपडेटनुसार, श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुलासाठी आई-वडील ऑस्ट्रेलियात जाणार...
श्रेयस अय्यर एक आठवड्यापर्यंत सिडनी येथील रुग्णालयात राहण्याची शक्यता आहे. तसेच श्रेयस अय्यर किती दिवस मैदानाबाहेर राहणार हे पुढच्या काही दिवसांमध्ये निश्चित होणार आहे. मात्र बीसीसीआयने त्याच्या पुनरागमनााबबत अद्याप कुठलीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. तशातच रेव्ह्जस्पोर्ट्स ग्लोबलने दिलेल्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरचे आई-वडील देखील आता ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी त्यांनी तातडीच्या व्हिसासाठी अर्ज केला आहे. व्हिसा मंजूर झाल्यानंतर ते लवकरच सिडनीला जाण्यासाठी निघतील असे सांगितले जात आहे.
बीसीसीआयने श्रेयस अय्यरसंदर्भात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हणले आहे की, सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरच्या डाव्या बरगडीच्या खालील भागाला दुखापत झाली. त्याला पुढील तपासणीसाठी रुग्णालयात नेले असता तिथे करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये त्याच्या प्लिहामध्ये (Spleen) कट दिसला. सध्या श्रेयस अय्यरवर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्याच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक सिडनी आणि भारतातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करून त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, भारतीय डॉक्टर श्रेयस अय्यर याच्यासोबत सिडनीमध्ये थांबले आहेत.