Shreyas Iyer Injury Updates: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सध्या सिडनी येथील रुग्णालयात दाखल आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात अलेक्स कॅरीचा झेल घेताना त्याला दुखापत झाली होती. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि आता त्याला आयसीयूतून बाहेर हलवण्यात आले आहे. याचदरम्यान, श्रेयस अय्यरने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून प्रकृतीबद्दल अपडेट दिले आहे.
"माझी प्रकृती आता सुधारते आहे. दिवसेंदिवस मी अधिक तंदुरूस्त होत आहे. तुम्हा सर्वांनी मला दाखवलेला पाठिंबा आणि माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना याने मी भारावून गेलो आहे. तुम्ही सर्वजण माझी इतकी काळजी करता हे पाहून मला खूप समाधान वाटलं. माझे फॅन्सचे प्रेम हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केलेल्या सदिच्छांसाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद!" अशा शब्दांत श्रेयस अय्यरने सोशल मीडियावरून आपल्या प्रकृतीची अपडेट दिली.
![]()
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले, "श्रेयसची प्रकृती झटपट सुधारतेय. जीवाचा धोका टळला आहे. त्याची प्रकृती डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारत आहे. मी डॉक्टरांशी सतत संपर्कात आहे. सामान्यपणे अशा प्रकारची दुखापत झालेल्या व्यक्तीला पूर्णपणे बरे होण्यासाठी सहा ते आठ आठवडे लागतात. परंतु श्रेयस खूप झटपट रिकव्हर होतोय. डॉक्टर त्याच्या रिकव्हरीवर खूप समाधानी आहेत. श्रेयसने सामान्य दैनंदिन कामकाज सुरू केले आहे. श्रेयसवर शस्त्रक्रिया झालीच नाही. ती वेगळी प्रक्रिया होती. श्रेयस अय्यरसंदर्भात एक प्रक्रिया करण्यात आली जी अंतर्गत रक्तस्त्राव थांबवण्यासाठी करण्यात आली होती. म्हणूनच तो इतक्या लवकर बरा झाला."