भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मात्र या मालिकेपूर्वी भारतीय संघाला धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संघात पुनरागमन करण्यासाठी धडपडत असलेला भारताचा आघाडीचा फलंदाज श्रेयस अय्यर याचं संघातील पुनरागमन काही दिवसांसाठी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यर याला सेंटर फॉर एक्सिलेन्सकडून हिरवा झेंडा मिळालेला नाही. याआधीच्या वेळापत्रकानुसार श्रेयस अय्यर याला ३० डिसेंबर रोजी फॅसिलिटीमधून बाहेर पडायचं होतं. मात्र आता रिटर्न टू प्ले साठी त्याला आणखी आठवडाभर वाट पाहावी लागू शकते.
दुखापतीतून सावरत असलेला श्रेयस अय्यर कुठल्याही अडचणीशिवाय फलंदाजी करत होता. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याचं पुनरागनम जवळपास निश्चित मानलं जाच होतं. मात्र पोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याचं वजन झपाट्याने कमी झालं. तसेच वजन घटल्याने त्याची ताकद ऑप्टिमम लेव्हलपेक्षा कमी झाली. आता पुढच्या आठवडाभरात त्याच्यावर अधिकाधिक लक्ष दिलं जाईल. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही श्रेयस अय्यर बाहेर होता. तसेच विजय हजारे ट्रॉफीलाही तो मुकला होता.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, श्रेयस अय्यरच्या फलंदाजीमध्ये काही उणीव दिसत नाही. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना झालेल्या दुखापतीमुळे त्याचं वजन सुमारे ६ किलो कमी झालं होतं. आता त्याने काही प्रमाणात वजन वाढवलं आहे. मात्र त्याच्या स्नायूंच्या वस्तूमानात घट झाल्याने त्याच्या बळावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय टीम कोणतीही जोखीम पत्करू इच्छित नाही. श्रेयस अय्यर हा खूप आवश्यक खेळाडू असून, तो या दुखापतीमधूनन सावरणं अधिकाधिक आवश्यक आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ निवडण्यापूर्वी निवड समिती आमि व्यवस्थापनाना याबाबतची माहिती दिली जाईल.
दरम्यान, ११ जानेवारीपासून बडोदा येथे होणाऱ्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी ३ ते ६ जानेवारी दरम्यान विजय हजारे करंडक स्पर्धेत श्रेयस अय्यर खेळताना दिसेल, असे सांगण्यात येत होते. मात्र आता यात थोडा बदल झाला आहे. तसेच श्रेयस अय्यरला आता ९ जानेवारीनंतरच आवश्यक परवानग्या मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता श्रेयस अय्यर या स्पर्धेतील बाद फेरीमध्येच संघासाठी उपलब्ध असेल, या फेरीतील सामने १२ जानेारीपासून खेळले जाणार आहेत.