Shreyas Iyer Dog biting viral video: भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर विमानतळावर एका चाहत्याच्या कुत्र्याशी खेळायचा प्रयत्न करत असताना एक विचित्र घटना घडली. दुखापतीनंतर अय्यर अलीकडेच भारतीय संघात परतला आणि न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड झाली. प्लीहाच्या दुखापतीमुळे तो दोन महिने क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून तो मैदानात परतला. याचदरम्यान विमानतळावर अय्यरसोबत एक घटना घडली.
चाहत्याच्या सोबत असलेल्या कुत्र्याने केला हल्ला
अय्यरने मॅचसाठी लागणारा फिटनेस सिद्ध केला आणि आता न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यासाठी तो पूर्णपणे तयार आहे. या बहुप्रतिक्षित पुनरागमनाआधी एक थोडासा अपघात होता-होता वाचला. अय्यरचा एक चाहता हातात पाळीव कुत्रा घेऊन विमानतळावर उभा होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओप्रमाणे, अय्यर विमानतळाबाहेर पडताना दिसताच एक चाहता अय्यरकडे स्वाक्षरी घेण्यासाठी आला. अय्यरने स्वाक्षरी दिली. काही सेकंदांनंतर हातात कुत्रा घेऊन दुसरा चाहता आला. अय्यरने कुत्र्याशी खेळायचा प्रयत्न केला, तितक्यात कुत्र्याने हल्ला केल्यासारखे त्याची बोटं चावायचा प्रयत्न केला. अय्यर गाफिल नव्हता, त्यामुळे त्याने पटकन आपला हात मागे घेतला आणि हसत हसत निघून गेला.
विजय हजारेमध्ये चांगली कामगिरी
अय्यर सध्याच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळला. हिमाचल प्रदेशविरुद्ध संघाचे नेतृत्व करताना आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ५३ चेंडूत ८२ धावा केल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डावादरम्यान किंवा नंतर त्याला कोणतीही अस्वस्थता जाणवली नाही. खेळाचा ताण आणि शारीरिक तयारीबद्दलही कसलीच चिंता दिसली नाही. नंतर पंजाबविरुद्धच्या पुढच्या सामन्यात अय्यरने आणखी एक चांगली खेळी केली. त्याने ३४ चेंडूत ४५ धावा केल्या. आता तो भारतीय संघात भारताचा उपकर्णधार म्हणून पुन्हा एकदा आपली भूमिका बजावण्यास सज्ज झाला आहे.