Shashi Tharoor On Sanju Samson: ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी काल(18 जानेवारी) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे, तर शुभमन गिलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. याशिवाय, केएल राहुल आणि ऋषभ पंतला विकेटकीपर फलंदाज म्हणून संधी मिळाली आहे. पण, संजू सॅमसनच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. नेहमीप्रमाणे या मोठ्या टुर्नामेंटसाठी संजू सॅमसनची संघात निवड करण्यात आली आहे. यावरुन आता काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शशी थरुरांनी केसीएला फटकारले
संजू सॅमसनला संधी न दिल्यामुळे काँग्रेस खासदार शशी थरूर संतापले आहेत. त्यांनी यासाठी केरळ क्रिकेट असोसिएशनला (केसीए) जबाबदार धरले आहे. याला संजूचा केसीएसोबत झालेला वाद कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. झाले असे की, विजय हजारे ट्रॉफी 2024-25 सुरू होण्यापूर्वी संजू केरळ संघाच्या सराव शिबिरात हजर झाला नव्हता, त्यामुळे त्याला विजय हजारे ट्रॉफीतसाठी केरळ संघात घेतले नव्हते.

शशी थरूर यांनी X वर लिहिले, 'केरळ क्रिकेट असोसिएशन आणि संजू सॅमसनची दुःखद कहाणी. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे करंडक स्पर्धेच्या सराव शिबिरात सहभागी होण्यास संजूने असमर्थता दर्शवली होती, ज्यासाठी त्याने केसीएला आधीच पत्रही लिहिले होते. मात्र त्याला लगेचच संघातून वगळण्यात आले. त्यामुळेच आता संजूला भारतीय संघातही संधी मिळाली नाही.'
'विजय हजारे ट्रॉफीमध्ये ज्या फलंदाजाची सर्वोत्तम धावसंख्या 212* आहे, ज्याची भारतासाठी वनडेत सरासरी 56.66 आहे (दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातील शतकासह). क्रिकेट प्रशासकांच्या उद्दामपणामुळे त्याची कारकीर्द उद्ध्वस्त होत आहे. संजूला बाहेर ठेवून केरळचा संघ विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचू नये, याची खात्री केसीए मालकांनी केली,' असा आरोपही थरुर यांनी केला.
संजू सॅमसन जबरदस्त फॉर्मात
संजू सॅमसन गेल्या काही काळापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने गेल्या पाच टी-20 सैमन्यात तीनमध्ये शतके झळकावली आहेत. संजूने डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यातही शतक झळकावले. 30 वर्षीय संजूने भारतासाठी 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 56.66 च्या सरासरीने 510 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
Web Title: Shashi Tharoor On Sanju Samson: Sanju Samson out of Champions Trophy; Shashi Tharoor angry
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.