Shardul Thakur Team India: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर आहे. त्याने गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळ कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण तो सतत देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेत आहे. सध्या तो रणजी ट्रॉफीमध्ये ( Ranji Trophy ) मुंबई संघाकडून खेळत असून दमदार कामगिरी करताना दिसतो आहे. पण तरीही त्याचे टीम इंडियात पुनरागमन होण्याची शक्यता सध्यातरी धुसर आहे. अशा परिस्थितीत त्याचा मुंबई संघातील सहकारी पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw ) याच्याप्रमाणेच शार्दुल ठाकूरही एक मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.
पृथ्वी शॉच्या पावलावर पाऊल ठेवणार शार्दुल ठाकूर?
पृथ्वी शॉ याने दीर्घ काळापासून टीम इंडियासाठी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण क्रिकेट सुरु ठेवण्यासाठी आणि संघात पुनरागमन करण्यासाठी त्याने इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये अनेक वेळा भाग घेतला आहे. आता शार्दुल ठाकूरही असेच काहीतरी करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शार्दुल २०२५ च्या काउंटी चॅम्पियनशिपसाठी एसेक्स संघाचा भाग असणार आहे. टीम इंडियाला जूनमध्ये इंग्लंड विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत, शार्दुल ठाकूर काउंटी चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी करून टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल, असा अंदाज बांधला जात आहे.
शार्दुल ठाकूरला IPL मध्ये खरेदीदार नाही!
शार्दुल ठाकूर यावेळी आयपीएलचा भाग नाही. शार्दुल ठाकूरला आयपीएल २०२५ साठी चेन्नई सुपर किंग्जने कायम ठेवले नाही. त्यानंतर IPL Auction 2025 मध्येही कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले नाही. त्याने लिलावात त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवली होती. पण त्याला खरेदीदार मिळू शकला नाही. अशा परिस्थितीत, तो आयपीएल दरम्यान इंग्लंडला जाऊ शकतो आणि तिथे तो काउंटी चॅम्पियनशिपमध्ये एसेक्स संघाकडून खेळताना दिसू शकतो.
शार्दुल ठाकूरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
शार्दुल ठाकूरने आतापर्यंत टीम इंडियासाठी ११ कसोटी, ४७ एकदिवसीय आणि २५ टी-२० सामने खेळले आहेत. या काळात त्याने १२९ विकेट्स घेतल्या आहेत आणि ५ अर्धशतकांसह ७२९ धावाही केल्या आहेत. २०२३ पर्यंत शार्दुल टीम इंडियाचा एक महत्त्वाचा खेळाडू होता. तो २०२३ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होता. पण त्यानंतर मात्र तो पुन्हा टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकलेला नाही.