Shardul Thakur wife Instagram Stroy, Ranji Trophy : मुंबईच्या संघाला रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू काश्मीरविरूद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. रोहित शर्मासह सहा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा संघात समावेश असतानाही मुंबईला एलिट अ गटात अडीच दिवसांमध्ये जम्मू- काश्मीरविरुद्ध ५ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. २०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जम्मू काश्मीरने शनिवारी तिसऱ्या दिवशी चहापानाआधीच ५ बाद २०७ धावा करत सामना जिंकला. मुंबईच्या संघात अनेक दिग्गज होते. पण शार्दुल ठाकूर वगळता कोणालाही फारशी चमक दाखवता आली नाही. शार्दुलने पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतक झळकावले. त्याच्या या खेळीचे त्याच्या पत्नीने, मिताली पारूलकर ( Mittali Parulkar ) हिनेदेखील कौतुक केले.
जम्मू काश्मीर विरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरने मुंबई संघाच्या ताफ्यात जीवात जीव आणणारी खेळी साकारली. पहिल्या डावात मुंबईचा संघ १२० धावांत सर्वबाद झाला. त्यावेळी शार्दुलने ५१ धावांची खेळी केली. दुसऱ्या डावातही मुंबईची अवस्था ७ बाद १०१ असताना शार्दुलने दमदार शतक ठोकले. त्याने १८ चौकारांसह ११९ धावांची खेळी केली. स्टार बॅटिंग ऑर्डरचा भरणा असताना मुंबईला केवळ शार्दुलनेच धावा करून दिल्या. इतरांनी पूर्णपणे निराश केले. शार्दुलच्या या फलंदाजीवर पत्नीही खुश झाली. तिने शार्दुलचा फोटो पोस्ट करत इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, मला तुझा खूप अभिमान आणि गर्व वाटतो.
शार्दुलची झुंज, पण मुंबईचा पराभव
जम्मू काश्मीर विरुद्धच्या रणजी सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या टीम इंडियाच्या ताफ्यातील स्टार मंडळीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण त्यांना जे जमलं नाही ते शार्दुल ठाकूरने करून दाखवले. त्याने या सामन्यात पहिल्या डावात अर्धशतक झळकावून संघासाठी खेळी केली. दुसऱ्या डावात त्याने शतकी खेळीसह संघाला मजबूत स्थितीत नेले, पण तो संघाचा पराभव टाळू शकला नाही.