Join us
Daily Top 2Weekly Top 5

आफ्रिदीनं घरी सिंह पाळलाय? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

ट्विटरवरील फोटोंमुळे आफ्रिदी चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 16:49 IST

Open in App

नवी दिल्ली: पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी क्रिकेट विश्वात चांगलाच लोकप्रिय आहे. आफ्रिदी सोशल मीडियावरही खूप सक्रीय असतो. आफ्रिदी सोशल मीडियावर पोस्ट करत असलेल्या फोटोंमध्ये त्याच्या मुली अनेकदा पाहायला मिळतात. आफ्रिदीनं त्याच्या मुलींचे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आफ्रिदीनं पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये त्याच्या चार मुली अक्सा, अजवा, अंशा आणि असमारा दिसत आहेत. हे फोटो आफ्रिदीच्या घरातील आहेत. या फोटोंची चर्चा होण्याचं कारण म्हणजे, यामध्ये एक सिंह आणि हरण आहे. 'आपल्या जवळच्यांसोबत वेळ घालवणं छान असतं. मी विकेट घेतल्यावर जी पोझ द्यायचो, त्याच पोझची माझ्या मुलीनं नक्कल केली आहे,' असं आफ्रिदीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. प्राण्यांची काळजी घ्या. त्यांना आपल्या प्रेमाची गरज आहे, असंही त्यानं पुढे म्हटलं आहे. आफ्रिदीनं ट्विट केलेल्या फोटोत त्याच्या मुलीच्या मागे एक सिंह दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोत आफ्रिदिच्या हातात एक हरण आहे. आफ्रिदी या हरणाला बाटलीतून दूध पाजतो आहे.  

आफ्रिदीनं ट्विटरवर पोस्ट केलेल्या या फोटोंची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा आहे. शाहिदनं घरी सिंह पाळलाय का, असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत. काहींनी याबद्दल आफ्रिदीचं कौतुक केलं आहे. तर काहीजणांनी त्याच्यावर टीकादेखील केली आहे. वन्य प्राण्यांना अशाप्रकारे घरात ठेवणं कितपत योग्य आहे?, हे कायदेशीर आहे, असे प्रश्न काहींनी उपस्थित केले आहेत. 

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तानट्विटरसोशल मीडिया