Join us

Kane Williamson, PAK vs NZ Video: सूर्यकुमार बनायला गेला अन् विल्यमसन क्लीन बोल्ड झाला...

Kane Williamson Shaheen Afridi: विल्यमसनने केली झुंजार अर्धशतकी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 16:55 IST

Open in App

Kane Williamson Shaheen Afridi Video: पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. त्यासोबतच आता, शाहीन शाह आफ्रिदीही फॉर्ममध्ये परतला असल्याने पाकिस्तानी फॅन्सचा आनंद द्विगुणित होताना दिसत आहे. ICC T20 World Cup 2022 च्या सुरुवातीला शाहीन शाह आफ्रिदी त्या लयीत दिसत नव्हता, पण हळूहळू त्याने आपली लय पकडली. आता तो अपेक्षेप्रमाणे भेदक मारा करताना दिसतोय. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या T20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात त्याने न्यूझीलंडविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. या सामन्यात शाहीनने किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसनची विकेट घेतली. केन विल्यमसन सूर्यकुमार यादवसारखा स्कूप खेळण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यावेळी आफ्रिदीने त्याला क्लीन बोल्ड केले.

शाहीनने न्यूझीलंडविरुद्ध विकेट्स घेतल्या आणि कंजुष गोलंदाजी केली. त्याने चार षटकांमध्ये फक्त २४ धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. त्याने संघाच्या प्रमुख फलंदाजांच्या दोन्ही विकेट घेतल्या. आधी त्याने फिन ऍलनला बाद केले आणि नंतर विल्यमसनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने पहिल्याच षटकात ऍलनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. यानंतर शेवटच्या षटकात विल्यमसन क्लीन बोल्ड झाला. १७वे षटक टाकायला आफ्रिदी आला. तोपर्यंत न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन झुंज देत होता. पण मोठ्या धावसंख्येपर्यंत संघाला पोहोचवण्याच्या प्रयत्नात त्याने सूर्यकुमार यादवसारखा स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. तो चेंडू त्याला मारता आला नाही आणि त्यामुळे त्याची दांडी गुल झाली.

सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना किवी संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात 152 धावा केल्या. विल्यमसनने आपल्या संघासाठी 46 धावा केल्या. यासाठी त्याने 42 चेंडूंचा सामना करत एक चौकार, एक षटकार लगावला. डार्ली मिचेलने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने 35 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 53 धावा केल्या. डेव्हन कॉनवेने 20 चेंडूत 21 धावा केल्या. जेम्स नीशम 12 चेंडूत 16 धावा करून नाबाद राहिला.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२न्यूझीलंडपाकिस्तानकेन विल्यमसनसूर्यकुमार अशोक यादव
Open in App