सध्या भारत-इंग्लंड वनडे मालिका सुरु असून भारताने दोन पैकी दोन्ही सामने जिंकत मालिकेत २-० ची आघाडी घेतली. आता १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी अनेक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. आता जखमी खेळाडूंच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. इंग्लंडचा डावखुरा फलंदाज जेकब बेथेल याला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर जावे लागले आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने याची पुष्टी केली. तसेच, बेथेलच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून टॉम बॅन्टन याला भारतात बोलावून घेण्यात आले आहे.
कर्णधार बटलर काय म्हणाला?
जोस बटलर म्हणाला की, जेकब बेथेलला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे आणि तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार नाही. बेथेल दुसऱ्या वनडे सामन्यातही खेळू शकला नव्हता. इंग्लंडच्या पराभवानंतर अखेर बटलरने बेथेल चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्याची घोषणा केली. टॉम बॅन्टन चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात परतला आहे. तो अलीकडेच दुबईमध्ये ILT20 मध्ये खेळत होता. तिथे त्याने दोन शतके ठोकली. त्यामुळे तो चांगल्या फॉर्मात आहे.
आतापर्यंत ७ खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर
सर्व संघ जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमधून एकूण ७ मोठे खेळाडू बाहेर पडले आहेत. पाकिस्तानचा सॅम अयुब दुखापतीमुळे स्पर्धेत खेळू शकणार नाही. दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज ऑनरिक नॉर्खिया आणि गेराल्ड कोइत्झे हे देखील स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाचे जोश हेझलवूड आणि कर्णधार पॅट कमिन्स हे देखील चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार नाहीत. याशिवाय मार्कस स्टोइनिसनेही अचानक निवृत्ती घेतली आहे.