Join us

IND vs AUS: "71 शतकं करणं म्हणजे जोक नाही, विराट एक योद्धा आहे...", आरोन फिंचने कोहलीबद्दल केले मोठे विधान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील टी-२० मालिकेला २० सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 17:04 IST

Open in App

मोहाली : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामधील टी-२० मालिकेला २० सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी होणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार आरोन फिंचने (Aaron Finch) माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीबाबत (Virat Kohli) मोठे वक्तव्य केले आहे. आशिया चषकात विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली होती. अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यातून आपले वैयक्तिक 71 वे शतक ठोकून किंग कोहलीने सर्वांचे लक्ष वेधले होते. 

भारताविरूद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी आरोन फिंचने पत्रकार परिषदेत म्हटले की, विराट कोहलीला समजणे सोपे नाही. तुम्ही त्याला लिहून काढू शकत नाही. कोहलीने गेल्या 15 वर्षांत दाखवून दिले आहे की तो या खेळातील महान खेळाडूंपैकी एक आहे. अशा शब्दांत ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचने कोहलीचे कौतुक केले.

विराट एक योद्धा - फिंच 

"विराट कोहलीने मागील 15 वर्षात दाखवून दिले आहे की तो या खेळातील महान खेळाडूंपैकी एक आहे. खासकरून टी-20 क्रिकेटमध्ये तो असा खेळाडू आहे, ज्याने आपला खेळ नवीन उंचीवर नेला आहे आणि जेव्हा तुम्हाला त्याचा सामना करावा लागतो तेव्हा तुम्ही सर्वोत्तम तयारी करून मैदानात उतरता. विराट एक शानदार खेळाडू आहे आणि त्याने 71 आंतरराष्ट्रीय शतक केले आहेत. हे सोपे नाही, तो एक योद्धा आहे", असे आरोन फिंचने अधिक म्हटले. 

अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आरोन फिंचने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. फिंच मागील मोठ्या कालावधीपासून खराब फॉर्मचा सामना करत आला आहे. त्याने अखेरच्या एकदिवसीय सामन्यात देखील निराशाजनक कामगिरी केली आणि कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात तो केवळ 5 धावा करून बाद झाला. त्याने अखेरचा एकदिवसीय सामना न्यूझीलंडविरूद्ध खेळला आणि संघाला 3-0 ने मालिकाही जिंकून दिली. 

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धचे वेळापत्रक  - २० सप्टेंबर- मोहाली, २३ सप्टेंबर - नागपूर आणि २५ सप्टेंबर- हैदराबाद  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअ‍ॅरॉन फिंचविराट कोहलीआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ
Open in App