रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटीतील निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाच्या नव्या पर्वाला सुरुवात झालीये. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली नव्या संघाची बांधणी झाली असून या संघातून काही खेळाडूंचा पत्ता कट झालाय तर काही खेळाडू कमबॅकच्या संधीला मुकले आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे सरफराज खान. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघासोबत आणि मध्यफळीतील फलंदाजीसाठी प्रबळ दावेदार असलेल्या गड्याचा इंग्लंड दौऱ्यावरील संघातून पत्ता कट झालाय. संघात स्थान मिळाल्यावर त्याने दमदार कामगिरी केली. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी त्याने १० किलो वजन कमी करून दाखवलं. एवढी मेहनत घेऊन ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील गाजलेल्या प्रकरणामुळे त्याचा पत्ता कट झालाय का? असा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑस्ट्रेलिया दौरा, सरफराज खान अन् ड्रेसिंग रुममधील गोष्ट
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सरफराज खान टीम इंडियाचा भाग होता. या दौऱ्यात भारतीय संघाने फक्त एक सामना जिंकला. भारतीय संघाच्या खराब कामगिरीशिवाय हा दौरा भारतीय ड्रेसिंगरुममधील गोष्टींमुळे चर्चेत राहिला. सरफराज खानवर ड्रेसिंग रुममधील गोष्टी लिक केल्याचा आरोपही झाला. हे प्रकरण चांगलेच गाजले. या प्रकरणाला भारतीय क्रिकेट बोर्डाने दुजोरा दिला नव्हता. पण आता याच कारणामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यावर संधी मिळालेली नाही, अशी चर्चा रंगू लागली आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत, सरफराज खान कमी केलं होते १० किलो वजन
भारतीय संघातील अनेक स्टार आयपीएलमध्ये मग्न असताना सरफराज खान इंग्लंड दौऱ्यावरील कसोटीसाठी कठोर मेहनत घेताना दिसून आले. त्याने फिटनेसवर काम करताना कठोर डाएट प्लानसह जीममध्ये मेहनत घेत तब्बल १० किलो वजन कमी करून दाखवलं. पण हे सर्व करून त्याच्या पदरी आता निराशा आलीये. कारण त्याला भारतीय संघात स्थानच मिळालेले नाही.
रेड बॉल क्रिकेटमध्ये दमदार राहिलीये सरफराजची कामगिरी
२०२४ मध्ये सरफराज खान याने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. ६ कसोटी सामन्यातील ११ डावात त्याने ३ अर्धशतकासह एका शतकाच्या मदतीने ३७१ केल्या आहेत. १५० ही त्याची कसोटीतील सर्वोच्च कामगिरी राहिलीये. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सरफराज खान याने ६५ पेक्षा अधिकच्या सरासरीने ५४ सामन्यात ४५९३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या खात्यात १६ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.