IPL च्या मागील दोन हंगामात न दिसलेला आणि अबू धाबीच्या मिनी लिलावात पहिल्या सेटमध्ये अनसोल्ड राहिलेल्या सरफराज खानला CSK नं मोठा दिलासा दिला आहे. अनसोल्ड राहिलेल्या सरफराज खानवर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने दुसऱ्या फेरीत बोली लावली. मुंबईकराला ७५ लाख या मूळ किंमतीसह CSK नं आपल्या संघात सामील करून घेतले. २०१५ च्या हंगामात IPL पदार्पण करणारा सरफराज २०२३ नंतर पुन्हा IPL खेळताना दिसणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वयाच्या १७ व्या वर्षी IPL मध्ये पदार्पणाची संधी, पण हंगामानुसार किंमत कमी होत गेली
देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेड बॉल आणि व्हाइट बॉलमध्ये खोऱ्यानं धावा काढणारा सरफराज खान IPL मध्ये अद्याप धमक दाखवू शकलेला नाही. २०१५ च्या हंगामात वयाच्या १७ व्या वर्षी त्याने RCB च्या संघाकडून ५० लाख रुपयांसह IPL मध्ये पदार्पण केले होते. या हंगामात तो सर्वात युवा खेळाडू ठरला होता. १३ सामन्यात संधी मिळाली. पण त्याने फक्त १११ धावाच केल्या. कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे त्याची IPL मधील किंमत कमी झाली. २०१९ ते २०२१ या दोन हंगामात तो २५ लाखांसह तो पंजाब संघाचा भाग होता. त्यानंतर २०२२ आणि २०२३ मध्ये तो दिल्लीच्या संघाकडून खेळताना दिसला. यावळी त्याला प्रत्येक हंगामात २० लाख रुपये मिळाले होते.
CSK चा डबल धमाका! रणनिती बदलून अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर ओतला पाण्यासारखा पैसा
पगारवाढीसह CSK कडून मिळाली संधी
यंदाच्या लिलावात ७५ लाखासह त्याने लिलावात नाव नोंदणी केली. रणजी स्पर्धेसह सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील धमाकेदार फटकाबाजीसह त्याने टी-२० तही मोठा धमाका करु शकतो, हे दाखवून दिले आहे. CSK च्या संघाने बेस प्राइजसह त्याच्यासाठी जी रक्कम मोजली आहे ती IPL च्या आतापर्यंतच्या इतिहासात त्याला मिळालेले सर्वाधिक पॅकज आहे. ५० लाखाहून २० लाखापर्यंत घसरलेली प्राइज आता ७५ लाखांवर गेली आहे. त्यामुळे पगारवाढीसह CSK कडून मिळालेल्या संधीच सोनं करत तो कामगिरीसह पगाराचा आलेख वाढवणार का? ते पाहण्याजोगे असेल.