Join us
Daily Top 2Weekly Top 5

हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट

क्रिकेटच्या देवानं सांगितला खास किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 22:01 IST

Open in App

मुंबई : माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने मंगळवारी माजी भारतीय खेळाडू गुरशरण सिंह यांच्या त्या जिद्दीची आठवण करून दिली. ज्यामध्ये १९८९-९० मध्ये दिल्लीविरुद्धच्या इराणी करंडक सामन्यात शेष भारताकडून खेळताना फ्रॅक्चर झालेल्या हातानेही ते ११ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आले. त्यामुळेच मास्टर ब्लास्टर सचिन यांना आपले शतक पूर्ण करता आले.

या दिग्गज हाताला फ्रॅक्चर असूनही सचिनच्या शतकासाठी उतरला होता मैदानात अन्...

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या त्या सामन्यात दिल्लीने शेष भारताला ३०९ धावांनी हरवले होते. या सामन्यात सचिन तेंडुलकरनं नाबाद १०३ धावांची खेळी केली, तर डब्ल्यूव्ही रमण ४१ धावांसह दुसरे सर्वाधिक धावा करणारे ठरले होते. शेष भारताने ५५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २०९ धावांवर ९ बळी गमावले होते. गुरशरण यानंतर हाताला फ्रॅक्चर असूनही ११ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरले आणि सचिन यांना साथ दिली. 

क्रिकेटच्या देवानं सांगितला खास किस्सा

दोघांनी अखेरच्या विकेटसाठी ३६ धावा जोडल्या. सचिन तेंडुलकरचे शतक पूर्ण झाल्यावर गुरशरण 'रिटायर आउट' झाले आणि शेष भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर संपुष्टात आला. सचिन तेंडुलकरनं मंगळवारी एका कार्यक्रमात सांगितले की, 'जसे म्हटले जाते की, वचने पाळण्यासाठी असतात. माझ्या मते, मी एक पाऊल पुढे जाऊन सांगेन की, वचने पाळण्यासाठी असतात, पण ती पूर्णदेखील करावी लागतात.' सचिन एजेस फेडरलच्या कार्यक्रमात बोलत होता. तो पुढे म्हणाला की, 'मला एक प्रसंग आठवतो. १९८९ मध्ये, जेव्हा मी इराणी करंडक खेळत होतो. भारतीय संघात निवड होण्यापूर्वी तो एक प्रकारचा सराव सामना होता. मी ९० धावांच्या आसपास फलंदाजी करत होतो आणि माझे साथीदार गुरशरण सिंग यांना दुखापत झाली होती आणि त्यांना फलंदाजी करायची नव्हती. तरीही निवड समितीचे अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांनी त्यांना फलंदाजी करण्यास आणि आपल्या साथीदाराला साथ देण्यास सांगितले. गुरशरण मैदानात आले आणि त्यांनी मला शतक पूर्ण करण्यात मदत केली. त्यानंतर माझी भारतासाठी खेळायला निवड झाली.'

...आणि वचन पूर्ण केले

सचिन म्हणाला की, 'गुरशरण यांचा हा निर्णय हृदयाला खूप भावला. त्यावेळी निवृत्त झालेल्या खेळाडूंसाठी विशेष सामना खेळविला जायचा. मी गुरशरण यांना वचन दिले होते की, त्यांच्या निवृत्तीनंतरच्या सामन्यात मी नक्की खेळेल आणि एप्रिल २००५ मध्ये दिल्ली येथे तो सामना खेळून मी गुरशरण यांना दिलेले वचन पूर्ण केले.'

टॅग्स :सचिन तेंडुलकरभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ