मुंबई - क्रिकेटचा देव म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेला भारतरत्न सचिन तेंडुलकर सध्या निवृत्ती एन्जॉय करतोय. क्रिकेटच्या सर्वच प्रकारांतून निवृत्त झाल्यानंतर तो आता सोशल मीडियातून चाहत्यांना भेट देत असतो. अनेकदा चाहत्यांशी गप्पाही मारतो. गेल्या काही महिन्यांपासून त्याचा सोशल मीडियावरील वावर आणि प्रत्यक्ष गावच्या फिल्डवर उतरल्याचे व्हिडिओ आपण पाहतोय. कधी चहावाल्यामुलासोबत दिसतो, तर कधी मंदिरात दर्शनासाठी असतो. आता, होळीच्या शुभेच्छा घेऊन सचिन चाहत्यांच्या भेटीला आलाय. पांढरा शुभ्र कुर्ता परिधान केलेल्या रंगीबेरंगी अवस्थेत सचिनने ट्विटरवर फोटो शेअर केलाय.
सचिनने ट्विटवरुन सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच, त्याच्या हातात एक ताट आणि वाटी दिसत आहे. माझ्या हातातील या ताटात काय आहे? असा प्रश्न सचिनने चाहत्यांना केलाय. तसेच, तुम्ही ओळखू शकाल का असेही सचिनने म्हटलंय. सचिनच्या या ट्विटवर चाहत्यांनी कमेंट करुन उत्तर दिलंय. त्यामध्ये, जवळपास सर्वांनीची पुरण पोळी असं उत्तर लिहिलंय. तर, सचिनच्या हातातील ताटातही पुरण पोळीच असल्याचं दिसून येतंय.
एका
ट्विटर युजर्संने होळी रे होळी, पुरणाची पोळी.. अशीही कमेंट केलीय. तर, काहींनी पंबाजी पराठा आणि दही असल्याचं म्हटलंय. मात्र, सचिन हा मराठामोळा माणूस असल्याने मराठी घरातील परंपर आणि संस्कृतीनुसार होळीच्या दिवशी पुरणाची पोळी आणि दुध खाल्ले जाते. सचिनच्या ताटाही पुरणपोळी आणि दुधाचीच वाटी असल्याचं दिसून येतय. सचिन सध्या कुटुंबीयांसमवेत आपले सण-उत्सव आनंदाने साजरे करताना दिसून येतो.