SA vs AUS : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर सूर गवसला आहे. खराब कामगिरीशी झगडणाऱ्या वॉर्नरने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतक झळकावले. त्याने आजच्या खेळीने टीकाकारांना गप्प केलेच, शिवाय महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.
डेव्हिड वॉर्नरने सुरुवातीला ५० धावांचा टप्पा ओलांडून एक विक्रम नोंदवला. ऑसींनी १० षटकांत १०२ धावा चोपल्या अन् आफ्रिकेतील ही पॉवर प्लेमधील सर्वोत्तम खेळी ठरली. याचवेळी डेव्हिड वॉर्नरने ५०+ धावा करून वन डे त ६००० धावांचा टप्पा ओलांडला. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी १२१ इनिंग्जमध्ये ६०००+ धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड रोहितच्या नावावर आहे. हाशिम आमला ( १२३) व सचिन तेंडुलकर ( १३३ ) यांच्यानंतर वॉर्नरचा ( १४०) चौथा क्रमांक येतो. भारताचा शिखर धवन ( १४०) व सौरव गांगुली ( १४३) हे या विक्रमात पाचव्या व सहाव्या क्रमांकावर आहेत.

वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड या सलामीच्या जोडीने ११.५ षटकांत १०९ धावा फलकावर चढवल्या. हेड ३६ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ६४ धावांवर माघारी परतला. कर्णधार मिचेल मार्श भोपळ्यावर बाद झाला. पण, वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन यांनी खिंड लढवली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १५१ धावांची भागीदारी केली. वॉर्नरने ९३ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०६ धावा केल्या. वन डेतील हे त्याचे २०वे शतक ठरले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ओपनर म्हणून हे त्याचे ४६वे शतक ठरले. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा ४५ शतकांचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम वॉर्नरच्या नावावर नोंदवला गेला आहे. ( David Warner now has the record for most international hundreds as opener) ख्रिस गेल ( ४२), सनथ जयसूर्या ( ४१), मॅथ्यू हेडन ( ४०) व रोहित शर्मा ( ३९) हे या विक्रमात पाठोपाठ आहेत.