भारतीय अंडर १९ संघाचे नेतृत्व करताना वैभव सूर्यवंशी याने पुन्हा एकदा आपल्या भात्यातील धमाकेदार खेळीचा नजराणा पेश केला आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या यूथ वनडेत वैभव सूर्यवंशीनं आधी संयमी सुरुवात केली. पण १७ चेंडूचा सामना केल्यावर त्याने गियर बदलला. षटकार चौकारांची बरसात करत अवघ्या २३ चेंडूत त्याने अर्धशतक साजरे केल्याचे पाहायला मिळाले. अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेआधी वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून आलेली ही सलग दुसरी अर्धशतकी खेळी ठरली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सहा षटकाच्या खेळानंतर वैभव सूर्यवंशी १७ चेंडूचा सामना करून २८ धावांवर खेळत होता. सातव्या षटकात दोन चौकार आणि एक षटकार मारल्यावर एकेरी धाव घेत तो २२ चेंडूत ४९ धावांवर पोहचला. आठव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर स्ट्राइक मिळाल्यावर खणखणीत चौकार मारत त्याने २३ व्या चेंडूवर अर्धशतक पूर्ण केले. ही खेळी आणखी मोठी करुन संघाच्या धावफलकावर मोठी धावसंख्या उभारण्यासाठी तो जोर लावताना दिसेल.
वैभव सूर्यवंशीची कॅप्टन्सीत पहिली फिफ्टी! १० उत्तुंग षटकारांसह २८३ च्या स्ट्राईक रेटनं कुटल्या धावा
अंडर १९ वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या यूथ वनडेत वैभव सूर्यवंशीला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. पहिल्या सामन्यात तो १२ चेंडूचा सामना करून फक्त ११ धावांवर बाद झाला होता. पण दुसऱ्या सामन्यात २४ चेंडूत १० षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ६८ धावांची धमाकेदार खेळी करत त्याने नेतृत्वाचे ओझे खांद्यावर घेऊनही फलंदाजीतील कर्तृत्व सिद्ध करण्याची धमक असल्याची झलक दाखवून दिली. कॅप्टन्सीतील पहिले अर्धशतक झळकावण्यासोबत दुसऱ्या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने मालिका आधीच खिशात घातली आहे. वैभवच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडिया यजमान दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने मैदानात उतरली आहे. वैभव सूर्यवंशी कॅप्टन्सीत पहिले शतक झळकावण्याचा डाव साधला तर ही मालिका त्याच्यासाठी आणखी खास ठरेल.