दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पाकिस्तान विरुद्धच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना जिंकत ३ सामन्यांची मालिकाही खिशात घातली. सेंच्युरीयनच्या सुपर स्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यातील विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी करण्याचा खास डावही साधला आहे.
दक्षिण आफ्रिकेनं ३ चेंडूसह ७ विकेट्स राखून जिंकला सामना
मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या संघानं दुसऱ्या टी-२० सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर २०७ धावांचे टार्गेट सेट केले होते. रीझा हेंड्रिक्सच्या दमदार शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं हे आव्हान ३ चेंडू आणि ७ विकेट्स राखून विजय मिळवला.
टीम इंडियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
यासह आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा २०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या संघांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा संघ टीम इंडियासोबत संयुक्तरित्या अव्वलस्थानी पोहचला आहे. याआधी हा वर्ल्ड रेकॉर्ड टीम इंडियाच्या नावे होता. भारतीय संघाने पाच वेळा ही कामगिरी करून दाखवली आहे. ऑस्ट्रेलियाचाही या यादीत समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा २०० + धावांचा पाठलाग करणारे संघ
- भारत- पाच वेळा
- दक्षिण आफ्रिका- पाच वेळा
- ऑस्ट्रेलिया- पाच वेळा
पाकिस्तानच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड
एका बाजूला दक्षिण आफ्रिकेच्या संघानं टीम इंडियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरली साधली. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानवर लाजिरवाणी वेळ आली. पहिल्यांदाच २०० धावा केल्यावर पाकिस्तानच्या पदरी पराभूत होण्याची वेळ आली आहे. याआधी पाकिस्तानच्या संघाने २०२० मध्ये १९५ धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरल्याचा रेकॉर्ड होता. इंग्लंडच्या संघाने त्यांना पराभूत केले होते. यावेळी २०६ धावाही पाकिस्तानला कमी पडल्या.
शतकवीर रीझा ठरला दक्षिण आफ्रिकेचा हिरो
दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तान संघाने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. सॅम अयूबच्या ९८ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर त्यांनी निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २०६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून रीझा हेंड्रिक्सनं ११७ धावांची जबरदस्त खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.