Rohit Sharma Retirement : भारतीय क्रिकेट संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी विजेतेपद मिळवून दिल्यावर कॅप्टन म्हणून रोहित शर्मा कसा योग्य अशा चर्चा ऐकू येऊ लागल्या आहेत. घरच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत व्हाइटवॉशची नामुष्की आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभव यामुळे क्रिकेट जाणकार आणि चाहते रोहित शर्मावर प्रचंड टीका करत होते. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत जिंकल्यानंतर रोहित निवृत्त होणार अशीही चर्चा होती. पण तसे काहीही झाले नाही. मी पुढेही खेळत राहणार आहे असे थेट रोहितनेच सांगून टाकले. याचदरम्यान, रोहितबरोबर क्रिकेट खेळलेला त्याचा जुना सहकारी मित्र सुदीप याने त्याच्या निवृत्तीबाबत मोठे विधान केले आहे.
"रोहित शर्माला मी सुरुवातीपासून ओळखतो. तो कधीही गोंधळलेला नसतो. नेमकं काय करायचं हे त्याच्या मनात ठरलेलं असतं. त्यामुळे त्याला निवृत्ती घ्यायची असेल तेव्हा तो कुणालाही विचारत बसणार नाही, कुणाचंही मत विचारत बसणार नाही. तो थेट मनात आल्यावर निवृत्ती जाहीर करून टाकली, जेव्हा त्याला वाटेल की आता क्रिकेट खेळणं शक्य नाही," असे रोहितचा सहकारी सुदीप त्यागी स्पोर्टकीडाशी बोलताना म्हणाला. सुदीप हा भारतासाठी ४ वनडे खेळला आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून IPL देखील खेळला आहे.
सुदीप पुढे म्हणाला, "रोहित शर्मा सध्या ज्यापद्धतीचे क्रिकेट खेळतोय, ते पाहता त्याने कर्णधार म्हणून आपली कारकीर्द सुरू ठेवावी असं मला वाटतं. दोन ICC ट्रॉफी जिंकून रोहित शर्माने टीकाकारांना उत्तर दिले आहे. भारतीय संघासाठी रोहित शर्माने अनेक चांगल्या खेळी खेळल्या आहेत. तसेच, संघाला एकत्र ठेवण्यातही त्याचा मोठा वाटा आहे."
दरम्यान, रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये मोठे धक्के बसल्यानंतर त्याला कर्णधारपदावरून हटवले जाईल अशी शक्यता होती. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरोधातील पराभव बीसीसीआयच्या जिव्हारी लागणारे होते. त्या पराभवानंतर बीसीसीआयने अनेक नियम बदलले. पण सध्या कानावर येत असलेल्या चर्चांवरून असे दिसून येते की, जून २०२५ मधील भारताच्या इंग्लंडमधील कसोटी दौऱ्यासाठीही रोहित शर्माचे संघाचे नेतृत्व करेल.