ठळक मुद्देरोहित शर्माला विश्रांती देण्याचा बीसीसीआयचा निर्णयन्यूझीलंड 'A' विरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार नाहीसोशल मीडियावर बीसीसीआय ट्रोल
मुंबई : न्यूझीलंड 'A' विरुद्ध होणाऱ्या चार दिवसीय सामन्यात हिटमॅन रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निर्णय मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला. ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे महत्त्व लक्षात घेता रोहितचे भारत 'A' संघाकडून खेळणे महत्त्वाचे होते, परंतु बीसीसीआयने रोहितला विश्रांती देण्याचा निर्णय घेत नेटीझन्सचा रोष ओढावून घेतला आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रथम ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे. त्याला पुरेशी विश्रांती मिळावी याकरिता बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. ''वैद्यकीय टीमशी सल्लामसलत केल्यानंतर रोहितला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्यावरील वाढलेला कामाचा ताण लक्षात घेता त्याला न्यूझीलंड 'A' संघाविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात खेळण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. हा निर्णय संघ व्यवस्थापक आणि निवड समिती सदस्यांनी मिळून घेतला आहे,'' असे बीसीसीआयने स्पष्ट केले.
बीसीसीआयचा हा निर्णय चाहत्यांना काही पटलेला नाही. कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी रोहितला चार दिवसीय सामन्यात खेळवायला हवं होतं असं मत अनेकांनी व्यक्त केलं. ट्वेंटी-20 मालिकेपेक्षा ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका महत्त्वाची असल्याची आठवण अनेकांनी बीसीसीआयला करून दिली. बीसीसीआयचा हा निर्णय म्हणजे कसोटी संघातील रोहितच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा असल्याचे मत व्यक्त करत बीसीसीआयवर सडकून टीका केली.