Virat Kohli Rohit Sharma ODI World Cup 2027: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाचे अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली. या दोन्ही खेळाडूंनी २०२४ च्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर टी२० क्रिकेटचाही निरोप घेतला होता. सध्या हे दोन्ही खेळाडू फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. पण गेल्या महिन्यांपासून या दोन्ही खेळाडूंच्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विराट आणि रोहित हे २०२५च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा भाग होते, पण त्यानंतर ते क्रिकेटच्या मैदानावर उतरलेले नाहीत. त्याचदरम्यान, २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या प्लॅनिंगमध्ये या दोघांचा समावेश होणार की नाही, याबाबत एक माहिती समोर आली आहे.
रोहित आणि विराटबद्दल मोठी अपडेट
एका अहवालानुसार, या दोन्ही खेळाडूंच्या भविष्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, विराट कोहली आणि रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी वनडे मालिकांमध्ये खेळताना दिसतील. पण सध्या विराट ३६ वर्षांचा आहे तर रोहित ३८ वर्षांचा आहे. २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत तो ४० वर्षांचा होईल. भारताने शेवटचा वनडे वर्ल्डकप २०११मध्ये जिंकला होता. त्यामुळे अशा मोठ्या स्पर्धेसाठी आमची योजना स्पष्ट आहे. आता आम्ही काही तरुण खेळाडूंना संधी देऊ इच्छितो.
सूत्राने पुढे असेही सांगितले की, विराट-रोहित या दोघांनी निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले आहे. दोन्ही खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये खूप विक्रम केले आहेत. मला वाटत नाही की आता कोणीही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणेल. परंतु पुढील एकदिवसीय सामन्यांमध्ये ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या किती तंदुरुस्त राहतात हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. त्यानुसार पुढील निर्णय होतील.
टीम इंडिया २०२५च्या आशिया कपमध्ये खेळताना दिसणार
९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ मध्ये टीम इंडिया खेळताना दिसणार आहे. टीम इंडियाला या स्पर्धेतील पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर संघ १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळेल. तर तिसरा सामना ओमानविरूद्ध खेळला जाईल.