Saugata Roy on Rohit Sharma: कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वावरुन काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी केलेल्या विधानामुळे वाद सुरु झालाय. शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माला लठ्ठ म्हणत तो प्रभावहीन असल्याचे म्हटलं. त्यावर स्पष्टीकरण देताना रोहितबद्दल मला जे वाटलं ते मी बोलले, त्यात चूक काय? असा सवालही शमा मोहम्मद यांनी केला. दुसरीकडे आता तृणमूल काँग्रेसनेही रोहित शर्माच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रोहित शर्माला संघात घेतलं नाही पाहिजे असं विधान तृणमूलचे खासदार सौगत रॉय यांनी केलंय.
काँग्रेस प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माविरोधात एक धक्कादायक पोस्ट केली होती. त्यांच्या पोस्टनंतर भाजपने काँग्रेसला घेरलं असून शमा मोहम्मद यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर शमा मोहम्मद यांनी मी जे आहे तेच बोलले, त्यात चुकीच काही वाटत नाही, असं स्पष्टीकरण देखील दिलं. मात्र आता तृणमूलचे खासदार सौगत रॉय यांनी हा वाद पुढे नेला आहे. सौगत रॉय यांनी रोहित शर्मा भारतीय संघात नसावा असं म्हणत शमा मोहम्मद यांच्या वक्तव्याचे समर्थन केलं आहे.
रोहितला त्याच्या वजनाची अजिबात पर्वा नाही
"रोहित शर्माबद्दल जे बोलले गेले त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. शमा मोहम्मद यांनी जे म्हटलं ते राजकारणी म्हणून नव्हे तर प्रेक्षक म्हणून सांगितले. रोहित शर्माला किती दिवस सूट मिळत राहणार? त्याने दोन वर्षांतून एकदा शतक केलं आहे. तो २, ५, १० आणि २० धावांत बाद होतो. त्यामुळे रोहित शर्माला संघात स्थान मिळू नये किंवा त्याला हुकूमशहा बनवू नये. काँग्रेस नेत्या ज्या काही बोलल्या ते अगदी बरोबर आहे. त्याला त्याच्या वजनाची अजिबात पर्वा नाही. हे लोक फक्त जाहिरातींमध्ये मॉडेल बनतात खेळात नाही," असं सौगत रॉय म्हणाले.
बुमराह सर्वोत्तम कर्णधार होऊ शकतो - सौगत रॉय
"आता तर अनेक नवीन खेळाडू संघात आले आहेत जे चांगले खेळत आहेत. फिटनेसचा विचार केला तर जसप्रीत बुमराह सर्वोत्तम कर्णधार होऊ शकतो. तो सध्या दुखापतग्रस्त आहे त्यामुळे तो खेळत नाही. नवीन खेळाडूंमध्ये श्रेयससारखा मुलगा कर्णधार होऊ शकतो, पण रोहित शर्माला संघात स्थान मिळू नये," असं सौगत रॉय यांनी स्पष्ट केलं.
लोकशाहीनं मला बोलण्याचा अधिकार दिलाय - शमा मोहम्मद
"खेळाडूच्या फिटनेससंदर्भातील हे एक सामान्य ट्विट होते. ते बॉडी शेमिंग नाही. खेळाडू हा फिट असायला हवा. आणि मला वाटते की त्याचे (रोहित शर्मा) वजन थोडे अधिक आहे. त्यामुळे मी ते बोलले. या मुद्यावरून विनाकारण माझ्यावर हल्लोबोल केलाय जातो. लोकशाहीनं मला बोलण्याचा अधिकार दिलाय. जे बोलले त्यात चूक काय?," असा सवाल शमा मोहम्मद यांनी केला.
Web Title: Rohit Sharma should not be in the team statement of TMC MP Saugata Roy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.