Rohit Sharma On Retirement: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघानं रोहितच्या नेतृत्वाखाली दिमाखदार विजय नोंदवला. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं आता वनडेतही आयसीसी ट्रॉफी जिंकलीये. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा त्याचं भविष्य ठरवणारी असेल, अशी चर्चा सुरुवातीपासून रंगताना दिसली. खरंतर निवृत्तीच्या प्रश्नावर रोहितनं याआधीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. सध्या निवृत्तीचा कोणताही विचार करत नाही, मी पुढेही खेळत राहणार आहे, असे तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेच म्हणाला होता. पण तरीही टी-२० वर्ल्ड कप प्रमाणे यावेळी तो वनडे क्रिकेटसंदर्भात तो मोठा निर्णय घेईल, अशी चर्चा रंगली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहितला निवृत्तीचा प्रश्न, यावर रोहित म्हणाला की,....
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील विक्रमी विजयानंतर रोहित शर्माला निवृत्तीसंदर्भात प्रश्नही विचारण्यात आला. पण यावर रोहितनं जसं चाललंय तसेच चालू राहिल, असे म्हणत तुर्तास थांबणार नाही, हे पुन्हा एकदा त्याने स्पष्ट केले आहे. ३७ वर्षीय रोहित शर्माला ज्यावेळी फायनलनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्तीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आल्यावर तो म्हणाला की, "भविष्याचा काही प्लान नाहीये. जसं चाललंय तसंच पुढंही सुरु राहिल. मी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेत नाहीये. उगाच काहीतरी अफवा पसरवू नका."
फायनलमध्ये हिटमॅननं आपल्यात क्रिकेट बाकीये ते दाखवून दिलं
हिटमॅन रोहित शर्मानं फायनल सामन्यात ४१ चेंडूत अर्धशतक साजरे केले. १८ वर्षांच्या कारकिर्दीत नववी फायनल खेळताना त्याच्या भात्यातून पहिली फिफ्टी आली. या सामन्यात त्याने ८३ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकाराच्या मदतीने ७६ धावांची दमदार खेळी करत सामना टीम इंडियाच्या बाजूनं सेट केला.
केएल राहुल आणि पांड्यावर कौतुकाचा वर्षाव
फायनल बाजी मारल्यावर रोहित शर्मानं सर्वांचे आभार मानले. हे आमचं घरचं मैदान नाही, पण इथंला माहोल तुम्ही ( स्टेडियमवर उपस्थितीत प्रेक्षकांना उद्देशून) घरच्या मैदानात खेळत असल्यासारखा केलात, अशा शब्दांत त्याने चाहत्यांचे आभार मानले. लोकेश राहुल हा शांत डोक्यानं खेळतो. दबावात तो त्रस्त होत नाही. तो परिस्थितीनुसार खेळतो. त्याच्यामुळे हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंना आक्रमक अंदाजात खेळणं सहज सोपे होते,असेही रोहितनं म्हटले आहे.