Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिटमॅन रोहितनं मानले भारत सरकारचे आभार; देशासाठी आणखी ट्रॉफी जिंकण्याची व्यक्त केली इच्छा (VIDEO)

नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा? इथं पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 18:59 IST

Open in App

भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याला नुकतेच देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयुष्यातील अविस्मरणीय क्षणाबद्दल हिटमॅन रोहित शर्मानं कृतज्ञता व्यक्त केली आहे. हा सन्मान स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी अत्यंत खास क्षण असल्याचे त्याने म्हटले आहे.  भारत सरकारचे आभार मानताना त्याने भारतासाठी सामने जिंकण्याची आपली बांधिलकी कायम राहील, असेही रोहित म्हणाला आहे. त्याचे हे वक्तव्य आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याचं त्याचे स्वप्न अधोरेखित करणारे आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

इथं पाहा रोहितचा खास व्हिडिओ

दूरदर्शनच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन भारताचा माजी टी-२० वर्ल्ड चॅम्पियन रोहित शर्माचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात रोहित शर्मा म्हणतो की, "नमस्कार! पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल मी भारत सरकारचे मनापासून आभार मानतो. हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अतिशय खास क्षण आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीत ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्या सर्वांचे मी आभार मानतो. देशासाठी असेच सामने आणि ट्रॉफी जिंकण्याचा माझा प्रयत्न कायम राहील. धन्यवाद! जय हिंद!"

भारताविरुद्ध न खेळण्याच्या निर्णयाचा पाकिस्तानला पश्चात्ताप होईल, पण...- शाहिद आफ्रिदी

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये यश

रोहित शर्माने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मागील १९ वर्षांत तो सर्व फॉरमॅटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंपैकी एक आहे. फलंदाजीसह त्याने नेतृत्वात खास छाप सोडली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गत वर्षी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. एवढेच नाही  तर आयसीसी चॅम्पियनस ट्रॉफी स्पर्धेतही त्याने टीम इंडियाला यश मिळवून दिले आहे.  रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने  २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाने ही स्पर्धा  गाजवली.  २०२५ मध्ये  त्याच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील १२ वर्षांचा दुष्काळ संपवला होता. 

रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फलंदाजीचा विक्रमही दमदार आहे. ६७ कसोटी सामन्यात त्याने १२ शतकांसह ४,३०० हून अधिक धावा केल्या आहेत. आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ५ शतकासह ४२३१ धावांची नोंद आहे. या दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यावर तो आता फक्त वनडेत सक्रीय आहे. वनडेत त्याच्या नावे २८२ सामन्यात ११,५०० पेक्षा अधिक धावा असून या प्रकारात त्याने ३३ शतके झळकावली आहेत. २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत मैदानात उतरत ही स्पर्धा भारताला जिंकून देणं हे त्याचे स्वप्न आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Sharma Acknowledges Indian Government, Aims for More Trophies

Web Summary : Rohit Sharma honored with Padma Shri, expresses gratitude to the Indian government. He commits to winning more matches and trophies for India, highlighting his ambition to secure the upcoming World Cup.
टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ