Happy Birthday Rohit Sharma, Wishesh from mother: टीम इंडियाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा तडाखेबाज सलामीवीर रोहित शर्मा आज ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. जयपूरमध्ये त्याने आपल्या पत्नीसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. त्याला चाहत्यांकडून आणि क्रिकेट जगतातून अनेक शुभेच्छा मिळत आहेत. यातच सर्वात खास शुभेच्छा रोहितची आई पूर्णिमा शर्मा यांच्या आहेत. त्यांनी मुलाच्या वाढदिवशी खास १२ फोटो शेअर करत त्याला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
खास १२ फोटोंसह शुभेच्छा आणि आशीर्वाद
पूर्णिमा शर्मा यांनी त्यांचा मुलगा रोहित शर्माच्या वाढदिवशी इंस्टाग्रामवर १२ खास फोटोंचा कोलाज शेअर केला. यामध्ये त्यांनी बालपणापासून ते तरुणपणापर्यंतचे फोटो एकत्र केले आहेत. काही चित्रांमध्ये रोहित शर्मा त्याच्या भावासोबत दिसतोय, तर काहींमध्ये संपूर्ण कुटुंब सोबत असल्याचे दिसत आहे. रोहितच्या आईने फोटोमध्येच त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. 'एका महान मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा,' अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रोहितने भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत मिळवलेल्या यशाचा त्याच्या पालकांना नक्कीच अभिमान आहे. पाहा खास पोस्ट-
रोहितचा धडाकेबाज प्रवास
रोहित शर्मा १२ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी मित्रांकडून उसने पैसे घेऊन त्याला बोरिवली येथील क्रिकेट अकादमीमध्ये दाखल केले. अकादमीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहित शर्माला खेळताना पाहिले. त्यावेळी रोहित ऑफ-स्पिन गोलंदाजी करायचा. रोहितची गोलंदाजी पाहून दिनेश लाड यांनी त्याच्या काकांशी बोलून रोहितला स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश मिळवून दिला. एके दिवशी, दिनेश लाड यांनी रोहितला फलंदाजी करताना पाहिले. त्यावेळी त्यांना कळून चुकले की, रोहित गोलंदाजीसह चांगली फलंदाजीही करू शकतो. लाड यांनी रोहितच्या फलंदाजीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. रोहितने अंडर-१६ संघासाठी टेस्ट दिली. पण त्याची निवड झाली नाही. रोहितला सुरुवातीला अपयशाला सामोरे जावे लागले. पुढे रोहितने दमदार कामगिरीच्या जोरावर अंडर-१७ संघात स्थान मिळवले. त्यानंतर रोहितने कधीच मागे वळून पाहिले नाही.